मोदींचे गुजरातच्या जनतेला भावनिक पत्र
नवी दिल्ली – गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनेतासाठी पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी जातीयवाद नाही, तर विकासवाद स्वीकारा, असे आवाहन केले आहे.
मोदी ज्या गुजरात मॉडेलच्या आधारावर पंतप्रधान झाले, त्याच गुजरातच्या विकासावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. गुजरातमध्ये १५ वर्षांनंतर मैदानात उतरलेल्या भाजपला या निवडणुकीत विकास हा एकमेव मुद्दा असेल. त्यामुळे मोदींनी विकासाकडे पाहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
गुजरात २२ वर्षापूर्वी कसे होते आणि आज कसा बदल झालाय. गेल्या काही वर्षामध्ये भाजप सरकारसोबत मिळून तुम्ही सर्वानी विकास रथात सहभागी होत देशातच नाही, तर जगभरात गुजरातची ओळख निर्माण केली आहे. विकास आणि गुजरात हे दोन समानार्थी शब्द झाले आहेत, असे मोदींनी पत्रात लिहिले आहे. गुजरात हा आत्मा आहे, तर देश परमात्मा आहे, असेही मोदी म्हणाले. मोदींनी या पत्रातून यूपीए सरकारवरही निशाणा साधला आहे.
नर्मदा बंधा-यासाठी सरकारने मदत केली नव्हती, असे मोदींनी म्हटले आहे, जे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी यापूर्वीच नाकारलेले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत यंदा जातीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. कारण पाटीदार आरक्षणासाठी हार्दिक पटेलने भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. तर ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचाही काँग्रेसला पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपकडे विकास हाच एकमेव मुद्दा असेल.