देवगड पंचायत समितीअंतर्गत वळींवडे, चिखलवाडी (इळये), कुणकेश्वर, रामेश्वर या गावांमध्ये राबविण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांचे यशस्वी लाभार्थी, स्मार्ट डिजिटल स्कूल इळये १ जि.प.शाळा तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध कामांना देवगड तालुक्यातील व जिल्हा मुख्यालयातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट दिली. जिल्हा माहिती कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या वतीने शासनाच्या विविध योजनांमधील यशोगाथा प्रसारमाध्यमांना माहिती होण्याकरिता देवगड पंचायत समितीच्या सहकार्याने एकदिवसीय दौ-याचे आयोजन करण्यात आले होते.या दौ-यात ग्रामीण भागात शेतकरी राबवत असलेल्या विविध प्रकल्पांना भेटी देता आल्या. कष्टक-यांची धडपड जवळून अनुभवता आली.
रोजगार हमी योजनेतून साकारलेला धूप प्रतिबंधक बंधारा ठरणार शेतक-यांसाठी वरदान
शिरगाव तामयेथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात येत आहे.या कामावरती असणारे रोजगार सेवक सुदर्शन पडेलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात असणा-या पाण्याच्या ओहोळामुळे शेतक-यांच्या जमिनींची मोठया प्रमाणात धूप होत होती. या योजनेच्या माध्यमातून लघु पाटबंधारे अंतर्गत साकारणारा हा धूपप्रतीबंधक बंधारा स्थानिक शेतक-यांना वरदान ठरणार आहे. ७ फूट उंच व ४०० मीटर अंतराचा हा धूपप्रतिबंधक बंधारा झाल्याननंतर परिसरातील शेतक-यांची शेती टिकण्यास मदत होणार आहे.
एकूण २१ लाख ८३ हजाराचे काम असून आज रोजी ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामावरती आज २४ मजूर आहेत. त्याचप्रमाणे शिरगांव येथील पाडागर येथे गोठणभाटी येथेही दुसरा धूपप्रतिबंधक बंधा-याचे काम हाती घेण्यात आले आहे. २४ लाख ८२ हजारांचे काम या ठिकाणी साकारले जात आहे.
५० टक्के काम या ठिकाणी पूर्ण झाले आहे. पावसाळयापूर्वी दोन्ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी रोजगार सेवक व सरपंचांनी सांगितले. या ठिकाणी भेट देते वेळी या गावच्या सरपंच उषा चौकेकर, उपसरपंच दिगंबर तावडे, माजी सरपंच मंगेश धोकटे, ग्रामसेवक डी.एस.चव्हाण यावेळी उपस्थित होते.
आधुनिक पद्धतीने शेतीचे धडे घेत आहेत इळये नं. १ येथील शेतकरी
शेतक-यांनी पिके घेताना त्या पिकांचा अभ्यास करावा तसेच भरघोस उत्पन्न घ्यावे यासाठी पंचायत समिती देवगड प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषद सेस अनुदान पीक प्रात्यक्षिक योजनेमध्ये संकरित कलिंगड व मिरचीची लागवड करण्यात आली आहे. या योजनेकरिता येथील विश्राम साटम या शेतक-याची निवड करण्यात आली आहे.
पीक लागवड ते पीक पूर्ण होईपर्यंत कृषि अधिकारी डी.एस.खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कलिंगड व मिरची लागवडीचा येथील शेतकरी धडा गिरवत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर गावातही शेतकरी निवड करून ही योजना मोठया स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.
स्मार्ट शिक्षणाचे धडे देणारी जि.प.शाळा इळये नं. १
सर्वांगीण शिक्षण व परिपूर्ण शिक्षणाचे धडे देणारी स्मार्ट जि.प.शाळा इळये नं. १ चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी लॉकरची सुविधा, दप्तरालय, प्रश्नमंजूषा, गोबरगॅस, गांडूळखत, ऑक्सिजन पार्क , परसबाग, संगणक शिक्षण, औषधी वनस्पती, ओळख नेत्यांची, क्षेत्रभेट, वृक्षारोपण, बाल आनंद मेळावा, तालुकास्तरावर क्रीडा, कला व ज्ञानी मी होणार या तिन्ही प्रकारात यश संपादन करणारी देवगड तालुक्यातील एकमेव शाळा आहे.
या सर्व उपक्रमांची माहिती शिक्षक धर्मराज धुरत यांनी दिली.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृ तिक गीतही सादर केले. यावेळी सरपंच प्रणया साटम, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या प्रसाद साटम, मुख्याध्यापक वैशाली पवार यावेळी उपस्थित होते.
शेळी पालनातून आर्थिक सक्षमीकरण रामेश्वर येथील यशोगाथा
रामेश्ववर ता.देवगड मध्ये नीलेश बावकर यांनी शेळी पालन या उद्योगातून आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल केली आहे. सन २०१३ मध्ये जिल्हा परिषद वाढीव उपकराव्यतिरिक्त ५० टक्के अनुदान योजनेअंतर्गत शेळी पालन या व्यवसायाकरिता श्री.बावकर यांनी ७५ टक्के म्हणजे रु.३५,००० इतके अनुदान घेतले व स्वत:चे २५ टक्के असे मिळून हा व्यवसाय सुरू केला आहे.
ज्यावेळी श्री.बावकर यांनी अनुदान घेतले होते त्यावेळी त्यांच्याकडे १० शेळी व एक बोकड होते. आज रोजी ४८ पिलांसहित शेळया त्यांच्याकडे आहेत. शेळीपालन या व्यवसायामध्ये वर्षाला मिळणारा नफा वाढला असल्याची माहिती श्री.बावकर यांनी दिली आहे. स्वत:च्या असलेल्या शेतातील घरामध्ये शेळी पालन हा व्यवसाय त्यांनी केला असून शेळी व बोकड विक्रीबरोबरच लेंडी खत विक्रीतूनही वर्षाला जास्त नफा मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या शेतीपेक्षाही हा व्यवसाय अधिक फायदेशीर असल्याने या व्यवसायावर जास्त लक्ष केंद्रित केले असल्याचे श्री.बावकर यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पाकरिता पशुवैदय़कीय अधिकारी डॉ.एम.एन.घोगरे यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखीमुळेच आज शेळी पालन हा व्यवसाय सुखकर झाला आहे.
पंचायत समिती देवगड व शासनाकडून राबविण्यात येणा-या या योजनेमुळे नक्कीच मोठया प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचेही समाधान श्री.बावकर यांनी व्यक्त केले.
रामेश्वर वासीयांना मिळतेय रोज ताजे दूध
जिल्हा परिषद वाढीव उपकराव्यतिरिक्त ७५ टक्के अनुदान योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे वाटप करण्यात येतात. या योजनेकरिता रूपाली डामरे, चंद्रकांत डामरे, विजयानंद सुकटे यांनी मुऱ्हा जातीच्या प्रत्येकी दोन अशा सहा म्हैशींचा एकत्र प्रकल्प साकारला आहे. तीनही लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान मिळते.
लाभार्थ्यांचे स्वत:चे ५० टक्के अनुदान असे मिळून या म्हैशी खरेदी करण्यात आल्या आहेत. सन २०१२-१३ मध्ये सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायामध्ये या तिघांचा चांगला जम बसला आहे. पंचायत समिती देवगड अंतर्गत कडबा कुटी, चा-याचा ठोम, प्रशिक्षणही या लाभार्थ्यांना देण्यात आले आहे.
स्थानिक ठिकाणी दुग्ध विक्रीतून दर महिन्याला किमान ४० हजार नफा हे शेतकरी मिळवत आहेत. या प्रकल्पावरती ही पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एम.एन.घोगरे यांचे मार्गदशर्न आणि वेळेत लसीकरण होत असल्याची माहिती तीनही लाभार्थ्यांनी दिली. शिवाय स्थानिक बाजारपेठेत ताज्या दुधाला खूप मागणी आहे.
लोकांना आता या प्रकल्पातील दुधाची सवय झाली आहे. तीनही लाभार्थ्यांनी पंचायत समिती देवगडअंतर्गत या योजनेमुळे आपले जीवनमान उंचावण्यास मदत झाली असल्याबद्दल शासनाचे आभार मानले. यावेळी सरपंच नलिनी गिरकर उपस्थित होत्या.
पत्रकार दौ-याचा प्रारंभ देवगड तालुक्यातील शिरगाव या गावापासून करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती देवगड रवींद्र जोगल,गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती सहाय्यक संध्या गरवारे,अर्चना माने,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एम.एन.घोगरे, विस्तार अधिकारी एस.बी.शेळके, कृषि अधिकारी डी.एस. खराडे, जिल्हा मुख्यालयातील व देवगड तालुक्यातील पत्रकार या दौ-याला उपस्थित होते.