जाहिरातीसाठी जपानमधील एका सौंदर्यप्रसाधन कंपनीने एक विचित्र आणि यापूर्वी कोणीही न लढवलेली शक्कल शोधून काढली असून फार घाम न गाळता लिबर्टा ब्युटी प्रोडक्ट कंपनीची एक विचित्र, पण तितकीच हटके पद्धतीने जपानमधील वाकिनो अॅड कंपनीने जाहिरातबाजी केली आहे.
काखेसाठी वापरण्यात येणारे सौंदर्यप्रसाधन ही ब्युटी कंपनी तयार करते. त्यामुळे त्यांनी महिलांना या उत्पादनाच्या जाहिरातीचे स्टिकर्स काखेत चिकटवायला दिले आहेत. प्रत्येक महिलेला यासाठी ताशी दहा हजार येन म्हणजे जवळपास सहा हजार रुपये मानधन म्हणून दिले आहे. महिला ट्रेन किंवा बस प्रवासात अनेकदा संतुलनासाठी वरचे हँडल पकडतात. अशा वेळी काखेत चिकटवलेले जाहिरातीचे स्टिकर्स नजरेस पडतील आणि त्याची चांगली जाहिराती होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.
अशी जाहिरात आतापर्यंत कोणीही केली नसल्यामुळे या जाहिरातीची चर्चा सोशल मीडियावर अधिक होत आहे. जाहिरातींचे स्टिकर्स माणसांवर चिटकवून अशा प्रकारे जाहिरातबाजी करण्याची या कंपनीची ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही या कंपनीने अशाच वादग्रस्त जाहिराती केल्या आहेत.