गुरू अस्तामुळे यंदा लग्नाचे मुहूर्त उशिरा!, जानेवारीत एकही मुहूर्त नाही! जुलै २०१८ पर्यंत ५४ मुहूर्त !
मुरबाड – राज्यामध्ये तसेच देशात केंद्र सरकारने जीएसटी कर चालू केल्याने सर्वत्र नवीन वर्षात होणारे लग्न सोहळे महागणार, तर गुरू अस्तामुळे यंदा लग्नाचे मुहूर्त लांबणीवर. जानेवारी २०१८ मध्ये एकही मुहूर्त नाही. जुलै २०१८ पर्यंत एकूण ५४ मुहूर्त आहेत. तसेच आपल्या ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी पाडय़ात दिवाळीनंतर तुलसी विवाह होतो. त्यानंतर लग्न सराईला सुरुवात होते. त्यामुळे यंदा दिवाळीनंतर विवाहाची सुरुवात होणार असून त्यामध्ये गुरू अस्त आल्यामुळे दिवाळीमध्ये लग्न सोहळे झाले नाहीत; परंतु नोव्हेंबर ते जुलै २०१८ पर्यंत लग्नाचे जवळपास ५४ शुभ मुहूर्त आहेत, अशी माहिती मुरबाडचे भटजी रवींद्र खरे यांनी दिली आहे.
यंदा दिवाळीत विविध वस्तूंची खरेदी करून नागरिकांनी लग्नाची सुरुवात केली आहे; परंतु सध्याच्या कालावधीमध्ये एकीकडे महागाईचा भडका, नोटाबंदी तसेच जीएसटी या तीनही कारणांमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे ऐन लग्न सराईच्या काळात जीएसटीमुळे वधू-वरांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
सध्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात कडक उन्हाळा जाणवत असल्याने सर्व ग्रामीण व शहरी भागातील तसेच आदिवासी पाडय़ातील नागरिकांनी नोव्हेंबर २०१७ ते जानेवारी दरम्यान सर्वत्र विवाह सोहळे उरकण्यासाठी पसंती दिली जाते. गेल्यावर्षी कमी मुहूर्त होते तर २ वर्षापूर्वी ८५ ते ९० मुहूर्त होते. त्या तुलनेत यंदा शुक्राचा अस्त असल्याने खूप कमी मुहूर्त आहेत. त्यामुळे नागरिकांची लग्न सोहळ्यात व विविध ठिकाणांहून भटजींना लग्न सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी चांगलीच पंचायत होणार आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे एकंदरीत जीएसटीमुळे लग्न सराईवर मोठा परिणाम होणार, अशा प्रतिक्रिया मुरबाडमधील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
लग्न सराईला तुळशीच्या लग्नानंतर ख-या अर्थाने सुरुवात होते; परंतु यंदा दिवाळी ते २० पर्यंत लग्न सराईला ब्रेक मिळाला होता. त्यामुळे २१ नोव्हेंबरनंतर लग्नाचा धुमधडाका सुरू झाला आहे.
– श्री. रवींद्र खरे, (भटजी-ससाणे, मुरबाड)
नोव्हेंबर ते जुलै २०१८ पर्यंतचे मुहूर्त
नोव्हेंबर : २१, २३, २५, २८, २९
डिसेंबर : ३, १०, ११, १२
जानेवारी : शुक्र अस्तामुळे मुहूर्त नाही
फेब्रुवारी : ५, ९, ११, १८, १९, २०,२१, २४, २५
मार्च : ३, ४, ५, ६, १२, १३, १४
एप्रिल : १९, २०, २४, २५, २६, २७,२८, ३०
मे : १,२,३,४,६,७,८,९,११,१२
जून : १८, २३, २८, २९
जुलै : १, २, ५, ६, ७, १०, १५
मुरबाड ग्रामीण व शहरी भागात २१ नोव्हेंबर नंतर लग्न सराईचा धुमधडाका सुरू!