अणु शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी आयआयटी मुंबईच्या गर्व्हनस बोर्डाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला.
नवी दिल्ली – आयआयटी संचालकांच्या निवडीवरुन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर अणु शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी आयआयटी मुंबईच्या गर्व्हनस बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, काकोडकर यांनी राजीनामा दिल्यानंतर स्मृती इराणी यांनी मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या फोनवर चर्चा केली. यावेळी काकोडकर यांना पदावर राहण्यास सांगितले. त्यानंतर ते कार्यकाल पूर्ण होईपर्यंत पदावर राहण्यास राजी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
येत्या मे मध्ये काकोडकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल संपणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. मला पुढे जायचे आहे त्यामुळे मी राजीनामा दिल्याचे काकोडकर यांनी सांगितले. मात्र संचालकाच्या निवडीवरुन त्यांच्यामध्ये आणि इराणी यांच्यात मतभेद झाल्याबाबतचे कोणतेही विधान करणे त्यांनी टाळले.
आयआयटी पटना, भुवनेश्वर आणि रोपर यांच्या संचालकाच्या निवडीबाबत झालेल्या शोध आणि निवड समितीच्या बैठकीनंतर काकोडकरांनी राजीनामा दिला. या समितीच्या प्रमुखपदी इराणी होत्या. तर समितीच्या सदस्यपदी काकोडकर हे होते.
मंत्रालयाशी काही कारणावरुन मतभेद झाल्याने गेल्या वर्षी आयआआयटी दिल्लीचे संचालक आर. शेगांवरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दोनच महिन्यांनी काकोडकर यांनी राजीनामा दिला आहे. शेगांवकर यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही.