शिवशाही बसेसच्या तिकीट दरात सवलत, १ जूनपासून अंमलबजावणी परिवहन मंत्र्यांची घोषणा
मुंबई – एसटी बसमधून प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही या वातानुकूलित बसमध्ये सवलत देण्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. दरम्यान, १ जूनला एस.टी . महामंडळाचा ७० वा वधार्पनदिन असून या दिवसापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
सध्या एसटीच्या साध्या, रातराणी व निमआराम बसेसमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात ५० टक्के सवलत मिळते. अशा प्रकारची सवलत नव्याने सुरू झालेल्या वातानुकूलित शिवशाही बसेसमध्येसुद्धा मिळावी, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी परिवहन मंत्र्यांकडे केली होती. सध्या महाराष्ट्रात व आंतरराज्य मार्गावर एकूण ८५० शिवशाही बस धावत आहेत.
काही मार्गांवर शिवशाही बसशिवाय प्रवाशांना पर्याय राहत नाही. याची दखल घेत परिवहन मंत्री रावते यांनी याबाबत एसटी प्रशासनास प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या वातानुकूलित शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसेसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या ४५ टक्के तर वातानुकूलित शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बसेसमध्ये (एसी स्लीपर) एकूण तिकीट मूल्याच्या ३० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
येत्या १ जून, २०१८ रोजीपासून म्हणजे एसटीच्या ७०व्या वर्धापन दिनापासून ही सवलत राज्यभर लागू करण्यात येत आहे. याचा लाभ राज्यातील सर्व ज्येष्ठ प्रवाशांना मिळणार आहे.