बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीतील भारताची अव्वल जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनाप्पाने सोमवारी कॅनडा ओपन स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले.
कॅलगरी – बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीतील भारताची अव्वल जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनाप्पाने सोमवारी कॅनडा ओपन स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले.
अंतिम फेरीत ज्वाला-अश्विनी जोडीने अव्वल सीडेड इफे मुस्केन्स आणि सेलेना पिएक या हॉलंडच्या जोडीवर २१-१९, २१-१६ असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये मुस्केन्स-पिएक जोडीने चांगली झुंज दिली.
१९-१९ अशी बरोबरी असताना ज्वाला-अश्विनीने सलग दोन गुण घेत पहिला गेम जिंकला. दुसरा गेमही रंगतदार झाला. ज्वाल-अश्विनीने सुरुवातीला ५-० अशी आघाडी घेतली.
त्यानंतर भारतीय जोडी १५-६ अशी आघाडीवर असताना मुस्केन्स-पिएकने झुंजार खेळ करत सलग नऊ गुण घेत १५-१५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ज्वाल-अश्विनीने प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी न देता सलग सहा गुण घेत गेमसह स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
अंतिम सामना ३५ मिनिट चालला. स्पर्धेत ज्वाला-अश्विनीला तीसरे सीडींग मिळाले होते. २०१२ लंडन ऑलिंपिकनंतर ज्वाला-अश्विनीचे हे पहिले जेतेपद आहे.