मांडा-टिटवाळा शहरात अनधिकृत चाळींचे रान उभारले जात असून मंगळवारी पालिकेचे ‘अ’ प्रभागक्षेत्र अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करून येथील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
कल्याण- मांडा-टिटवाळा शहरात अनधिकृत चाळींचे रान उभारले जात असून मंगळवारी पालिकेचे ‘अ’ प्रभागक्षेत्र अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करून येथील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. मांडा व टिटवाळा परिसरातील सुमारे १२१ खोल्या व ९५ जोत्यांवर कारवाई कण्यात आली.
कल्याण-डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गाजत असताना टिटवाळय़ात रातोरात चाळी उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. टिटवाळय़ात आतापर्यंत शेकडो चाळी बांधण्यात आल्या असून, या बांधकामामुळे टिटवाळा शहराला मिनी धारावीचे स्वरूप आले आहे. टिटवाळय़ातील अनधिकृत बांधकामाकडे गेल्या अनेक वर्षापासून पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत होते. पालिका आयुक्त शंकर भिसे यांनी याची गंभीर दखल घेऊन अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसारच पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पोलिस बंदोबस्तात वासुंद्री रोड, नांदप रोड, इंदिरानगर, सांगुळा रोड, जी. आर. पाटील शाळा परिसर व टिटवाळा आदी भागांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. पालिकेची ही कारवाई आणखी तीन ते चार दिवस सुरू राहणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.