कोरम मॉलमध्ये मनीषाने ९ तास २ मिनिटे या वेळात २१ बाय २७ या आकाराची बॅग बनवली.
ठाणे- ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ने ठाण्यातील मनीषा ओगलेची नोंद घेतली आहे. २०१३मध्ये येथील कोरम मॉलमध्ये मनीषाने ९ तास २ मिनिटे या वेळात २१ बाय २७ या आकाराची बॅग बनवली होती. तिच्या याच कामाची दखल ‘गिनीज बुक’ने घेतली आहे. नुकताच तिचा ‘गिनीज बुक समिती’ व ‘लिम्का बुक ऑफ रेकार्ड’च्या वतीने गौरव करण्यात आला.
हजारो ग्राहकांच्या उपस्थितीत मनीषाने ही भव्य बॅग तयार केली होती. बॅग रंगवत असताना उपस्थित ग्राहक तिला क्षणाक्षणाला प्रोत्साहन देत होते. हाताने रंगवलेल्या या बॅगेवर ‘पाणी वाचवा, झाडे वाचवा’ व ‘प्लॅस्टिक वापर टाळा’ असे पर्यावरणपूरक संदेशही देण्यात आले होते.
मनीषा मागील आठ वर्षापासून कलाक्षेत्रात कार्यरत आहे. फेब्रिक पेटिंग हा तिचा आवडता प्रांत आहे. तिने अनेक शॉप व बुटिकसाठी वस्त्र सजावट केली आहे. तिने सजवलेल्या एका साडीला दुबई येथील एका बुटिकमध्ये स्थान मिळाले आहे.
या पूर्वी तिने ४० बाय २० फूट लांबीचा कुर्ता २९ तास २७ मिनिटांत रंगवून ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवले होते.