अवकाश निरीक्षणाची आवड असणा-यांसाठी डहाणूतल्या एका आदिवासी तरुणाने अनोखी संधी निर्माण करुन दिली आहे.
डहाणू- अवकाश निरीक्षणाची आवड असणा-यांसाठी डहाणूतल्या एका आदिवासी तरुणाने अनोखी संधी निर्माण करुन दिली आहे. डहाणू तालुक्यातील कासा गावातील चंद्रकांत घाटाळ या तरुणाने एक महाशक्तीशाली दुर्बीण तयार केली आहे. कोणतीही शासकीय मदत न घेता स्थानिक पातळीवरच त्याने ही दुर्बीण तयार केली कासा येथे अवकाश निरीक्षण केंद्रही सुरू केले आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थी, पालक आणि खगोलप्रेमींमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रकांत याने मुंबईतील वरळी येथून बी.ए., बी.एड.पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्याला असलेल्या खगोलशास्त्राच्या आवडीमुळे त्याने त्याला मिळालेली चांगली नोकरी सोडून खगोलशास्त्राकडे वळण्याचे ठरवले. यानंतर त्याने अथक प्रयत्नांनी ही महाशक्तीशाली दुर्बीण साकारली. यानंतर त्याने कासा येथे अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र सुरू केले.
पालघर जिल्ह्यातील अशाप्रकारचे हे पहिलेच निरीक्षण केंद्र आहे. या केंद्रात त्याने तयार केलेल्या दुर्बिणीद्वारे चंद्र, तारे, ग्रह, खुजे तारे, राक्षसी तारे, न्यूट्रॉन तारे, तेजोमेघ, दीर्घिका, खुले तारकागुच्छ, बंदिस्त तारकागुच्छ इत्यादी बाबी पाहता येऊ शकतात.
यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अल्पदरात या केंद्रात प्रवेश दिला जाणार असल्याचे त्याने सांगितले. कासासारख्या ग्रामीण भागात एका आदिवासी तरुणाने ही संधी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमधून त्याचे कौतुक होत आहे.