फुलपाखरांच्या सौंदर्याविषयी आपल्या मनात नेहमीच कुतूहल असते, याच कुतूहलापोटी डोंबिवलीत आता फुलपाखरांची बाग साकारणार आहे.
डोंबिवली- फुलपाखरांच्या सौंदर्याविषयी आपल्या मनात नेहमीच कुतूहल असते, याच कुतूहलापोटी डोंबिवलीत आता फुलपाखरांची बाग साकारणार आहे. नववर्षात ही बाग डोंबिवलीकरांसाठी खुली असेल.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या वतीने पूर्वेकडील रोटरी उद्यानात ही बाग साकारण्यात येत आहे. फुलपाखरांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने ही बाग विकसित केली जात असून, फुलपाखरांच्या प्रजननास आणि पोषणास आवश्यक अशी लँटेना, जमैकत, स्पाइक्स, रूई, अशोका, कडीपत्ता इत्यादी ५० प्रकारची झाडे या बागेत लावली जाणार आहेत.
या उद्यानाचे उद्घाटन ४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी यांच्या हस्ते होणार आहे. सुप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर महागावकर यांनी या उद्यानाची सजावट केली आहे.
डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने राजूनगर परिसरात ‘रोझ उद्यान’ साकारण्यात आले आहे. तर सावरकर रोडवरील रामभाऊ म्हाळगी उद्यानात नक्षत्राची बाग, शिवमंदिर रोडला वाहतूक उद्यान साकारले आहे. त्यात आता फुलपाखरांची बागही डोंबिवलीकरांसाठी आकर्षण ठरणार आहे.