महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असती तर त्याच्या घरासमोर मी धरणे धरले असते, असे विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी ‘एनडीटीव्ही’वरील एका कार्यक्रमात म्हटले.
नवी दिल्ली- महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असती तर त्याच्या घरासमोर मी धरणे धरले असते, असे विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी ‘एनडीटीव्ही’वरील एका कार्यक्रमात म्हटले.
‘‘धोनीने क्रिकेटमधून पायउतार होण्याचा निर्णय घेतला असता तर निर्णय बदलण्यासाठी मी त्यांच्या घरासमोर आंदोलन केले असते. एक क्रिकेटपटू म्हणून धोनी आजही विध्वसंक क्रिकेटपटू आहे. एका षटकात सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे. धोनीसारख्या क्रिकेटपटूची भारताला गरज आहे. वनडे आणि टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा देत त्याने खेळत राहायचे ठरवल्याने आनंद झाला. त्याच्यात अजून खूप क्रिकेट शिल्लक आहे,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.
विराट कोहली हा धोनीचा फलंदाज म्हणून पुरेपूर वापर करेल, असे गावस्कर यांना वाटते. ‘‘धोनीच्या अनुभवाचा पुरेपूर वापर कर्णधार कोहली करवून घेईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. धोनीने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी. तो जगातील एक सर्वोत्तम ‘फिनिशर’ आहे. कर्णधारपदाचा काटेरी मुकुट सांभाळताना फलंदाज आणि यष्टिरक्षक अशा दोन्ही भूमिकांना योग्य न्याय देऊ शकला नसता.
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीने बुधवारी वनडे आणि टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
सर्वांकडून धोनीची प्रशंसा
महेंद्रसिंग धोनीची जगभरातून प्रशंसा होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने त्याला आजवरच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांमधील एक असे म्हटले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कनेही तशाच प्रकारे धोनी तसेच त्याच्या नेतृत्वगुणांची तारीफ केली आहे.