वारंवार खंडित होणा-या वीजपुरवठय़ामुळे मलवाडा (ता. विक्रमगड) येथील स्वजन विद्यामंदिरातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना रात्र अंधारात काढावी लागत होती. मुंबई येथील एचडीएफसी बँक व सीएचआर एक्टिव्हिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वसतिगृह व संपूर्ण माध्यमिक शाळेसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देण्यात आली.
वाडा- वारंवार खंडित होणा-या वीजपुरवठय़ामुळे मलवाडा (ता. विक्रमगड) येथील स्वजन विद्यामंदिरातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना रात्र अंधारात काढावी लागत होती. मुंबई येथील एचडीएफसी बँक व सीएचआर एक्टिव्हिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वसतिगृह व संपूर्ण माध्यमिक शाळेसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देण्यात आली. या सौरऊर्जेवर चालणारे एकूण ३६ सौरदिव्यांचे उद्घाटन एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.
शिक्षक संचलित शिक्षण संस्था वाडा यांचे मलवाडा या खेडेगावात स्वजन विद्यामंदिर ही माध्यमिक शाळा आहे. या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये दोनशे विद्यार्थी याच शाळेच्या वसतिगृहात निवासी आहेत. या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना रात्र अंधारात काढावी लागते. त्यांच्या अभ्यासाचेही नुकसान होते.
या संस्थेचे माजी विद्यार्थी सुधीर कुलकर्णी व किरण जोशी यांनी येथील विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबाबत एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी अमरनाथ नागराजन व सुजित कुरूप यांच्याकडून मदतीची अपेक्षा केली. या अधिका-यांनी तत्काळ या संपूर्ण शाळेसाठी व वसतिगृहासाठी सौरऊर्जा युनिट बसवले. संस्थेचे सरचिटणीस बी.बी. जानेफळकर, एन.के. फडके, कोषाध्यक्ष अरविंद झामरे, सदस्य कौशिक सरोदे यांनी एचडीएफसी बँकेला विशेष धन्यवाद दिले आहेत.