अनिल अंबानींच्या नोटिशीला काँग्रेसचे प्रत्युत्तर
नवी दिल्ली – राफेल कराराबाबाबत निराधार, खोटे आणि बदनामी करणारे विधान केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस देणा-या उद्योगपती अनिल अंबानी आणि भाजपला काँग्रेसने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही करदात्यांचा आवाज दाबू शकत नाही, अशा शब्दात काँग्रेसने त्यांना सुनावले आहे.
राफेल सौद्यात काळंबेरं आहे, त्यामुळेच काँग्रेसला नोटीस पाठवली असल्याचे काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगील यांनी म्हटले आहे. मला आणि माझ्या पक्षाला आलेल्या नोटिशीवरून राफेल सौद्यात घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते. ही लोकशाही आहे. लोकांच्या कररूपी पैशातून हा सौदा होत आहे. त्यामुळे आम्हाला यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. अशा नोटिसा पाठवून तुम्ही करदात्यांचा आवाज दाबू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावले आहे.
शेरगील यांनी ट्विट करून भाजपवर निशाणा साधला. मोदी सरकारने हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लि. (एचएएल) या सरकारी कंपनीला राफेलचे काम न देता आपल्या उद्योगपती मित्राला हे काम दिले. सरकारने राफेल करारासाठी अतिरिक्त ४२ हजार कोटी रुपये का दिले हा प्रश्न विचारण्याचा देशातील प्रत्येक करदात्याला अधिकार असल्याचे ते म्हणाले.
ही लोकशाही आहे, आम्ही प्रश्न विचारणारच आणि सरकारला त्याचे उत्तर द्यावेच लागेल. ते आम्हाला अशा नोटिसा पाठवून घाबरवू शकत नाहीत. आम्ही लवकरच देशभरात पत्रकार परिषदा घेऊन राफेल घोटाळ्याचा भंडाफोड करू, असा इशाराही त्यांनी दिला. एक व्हीडिओ ट्विट करत शेरगील यांनी भाजप आणि अनिल अंबानी यांना प्रत्युत्तर दिले आहे.
राफेल युद्ध विमान खरेदीत ४२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. या करारावरून मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने सहा जणांची टीम तयार केली असून यात जयवीर शेरगील यांचा समावेश आहे. ही टीम मोदी सरकारवर राफेल करारावरून हल्लाबोल करणार आहे. अनिल धीरुभाई अंबानी समूहाने जयवीर शेरगील यांना नोटीस पाठवली आहे. नेता म्हणून तुम्ही राजकीय मुद्दय़ांवर भाष्य करू शकता. वादविवाद किंवा चर्चासत्रात तुमचे मत मांडू शकता. तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा आमचा प्रयत्न नाही. पण, तुमच्या पक्षातील अशोक चव्हाण, रणदीप सुरजेवाला, संजय निरुपम, डॉ. अभिषेक मनू सिंघवी आदी नेते राफेल करारावरून अनिल धीरुभाई अंबानी समूहावर खोटे आणि निराधार आरोप करत आहे. यातून समूहाची बदनामी केली जात असून त्यांना देखील आम्ही नोटीस पाठवली आहे, असे नोटीशीत म्हटले आहे.