तेल उत्पादन गोठवल्यास आमच्यावरील निर्बंध आणखी काही काळ राहतील, असे सांगत इराणने तेल उत्पादन गोठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
तेहरान– तेल उत्पादन गोठवल्यास आमच्यावरील निर्बंध आणखी काही काळ राहतील, असे सांगत इराणने तेल उत्पादन गोठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. १६ जानेवारीला निर्बंध उठवल्यापासून इराणने तेलाचा उपसा जोरदार सुरू केला आहे.
प्रतिस्पर्धी तेल उत्पादक देशानी पुरवठा वाढवून तेलाच्या किमती कोसळवल्या, असा आरोप इराणच्या तेलमंत्र्यांनी केला आहे. गेल्या आठवडयात प्रमुख तेल उत्पादक देश रशिया, सौदी अरेबिया तेल उत्पादन गोठवण्यावर करार करतील, अशा आशा होत्या. त्यावरच तेलाच्या किमतींनी उसळी घेतली होती. मात्र दोहामधील बैठकीत तसेच काहीच घडले नाही.
परिणामी तेलाच्या किमती परत कोसळल्या. ओपेक सदस्य इराणने दोहाच्या बैठकीस आपला प्रतिनिधी पाठवला नव्हता. तेहरानचे तेलमंत्री बिजन झंगानेह यांच्या वक्तव्यामुळे इराण आपली भूमिका का बदलत नाही, तेही स्पष्ट झाले आहे. तेलाचे उत्पादन गोठवण्यास मान्यता देणे म्हणजे देशावरील निर्बंध स्वीकारण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.
जानेवारीच्या स्तरावर तेल उत्पादन आणणे म्हणजे इराणवरील निर्बंध उठवलेलेच नाहीत, असा अर्थ होईल. इराणची निर्यात त्याच स्तरावर पुन्हा येईल, असेही त्यांनी सांगितले. तेलाची बाजारपेठ अस्थिर करण्यात इराणची काहीही भूमिका नाही. तेलाची बाजारपेठ अस्थिर ज्यांनी केली ते आज त्यापासून दूर पळत आहेत, असा आरोप झंगेनाह यांनी केला.