रोमिंगमध्ये आपआपसांतील ग्राहकांना थ्री-जी सेवा देण्याच्या उद्देशाने सोमवारी दूरसंपर्क क्षेत्रातील रिलायन्स कम्युनिकेशन, टाटा टेलिसव्र्हिसेस आणि एअरसेल या तीन कंपन्यांनी एकी केली.
नवी दिल्ली- रोमिंगमध्ये आपआपसांतील ग्राहकांना थ्री-जी सेवा देण्याच्या उद्देशाने सोमवारी दूरसंपर्क क्षेत्रातील रिलायन्स कम्युनिकेशन, टाटा टेलिसव्र्हिसेस आणि एअरसेल या तीन कंपन्यांनी एकी केली. या करारामुळे टाटा टेलिसव्र्हिसेस आणि एअरसेलच्या ग्राहकांना दिल्ली आणि मुंबईतही रिलयान्सच्या सर्कलमध्ये रोमिंग शुल्काशिवाय थ्री-जी सेवेचा लाभ घेता येणार आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन आणि एअरसेलने २२ पैकी १३ सर्कलमध्ये थ्री-जी सेवेसाठी करार केला आहे. तर टाटा टेलिसव्र्हिसेसने नऊ सर्कलमध्ये थ्री-जी सेवेसाठी सहकार्य करार केला आहे. या करारांमुळे रिलायन्स कम्युनिकेशनला दूरसंपर्क क्षेत्रात आपले पाय आणखी भक्कम करता येणार आहेत. तर ग्राहकांना थ्री-जी सेवेत नॅशनल रोमिंग देणारी ही पहिली कंपनी ठरली आहे.
रोमिंगमध्येही थ्रीजी सेवा देताना आनंद होत असल्याचे रिलायन्स कम्युनिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुदीप सिंग यांनी सांगितले. दिल्ली, मुंबई, कोलकाता, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, बिहार, ओदिशा, आसाम, जम्मू-काश्मीर या सर्कलमध्ये रिलायन्सकडून सेवा दिली जात आहे. तर या कराराने रिलायन्स कम्युनिकेशनला पाच नवे सर्कल शेअर करायला मिळणार आहेत. ज्यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि उत्तर प्रदेश पूर्व या सर्कलमधील रिलायन्स ग्राहकांना थ्री-जी सेवा अॅक्सेस करता येईल. तर एअरसेल आणि टाटा टेलिच्या ग्राहकांना रिलयन्सच्या मुंबई आणि दिल्ली सर्कलमध्ये थ्री-जी सेवा घेणे शक्य होणार आहे.
रिलायन्स कम्युनिकेशनचे देशभरात थ्री-जीचे विस्तीर्ण नेटवर्क आहे. ऑप्टिकल फायबर केबलची देशभर असलेली जाळी कंपनीसाठी जमेची बाजू आहे. गेल्या वर्षभरात याच कारणामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ टेलिकॉमनेही फोर-जी सेवेसाठी रिलायन्स कम्युनिकेशनशी तीन वेळा करार केला आहे.
‘एकमेकां सहाय्य करू’
आधीच स्पेक्ट्रमसाठी मोठी किंमत मोजल्यामुळे दूरसंपर्क कंपन्यांना खर्च कमी करून महसूल वाढवावा लागणार आहे. त्यामुळे एकमेकांशी परस्पर सहकार्य केल्याशिवाय या कंपन्यांकडे पर्याय उरलेला नाही. त्यामुळे थ्री-जीसाठी रिलायन्स कम्युनिकेश, टाटा आणि एअरसेलने करार करत ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.