पुढील दोन महिन्यांत दमदार पुनरागमन करेन, असा विश्वास भारताची अव्वल महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोमने मंगळवारी एक कार्यक्रमात व्यक्त केला.
कोलकाता – पुढील दोन महिन्यांत दमदार पुनरागमन करेन, असा विश्वास भारताची अव्वल महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोमने मंगळवारी एक कार्यक्रमात व्यक्त केला.
‘‘दुखापतीमुळे मला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होता आले नाही. पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने सहभागी न होण्याचा निर्णय योग्यच आहे, असे मला वाटते. कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याच्या ईर्ष्येनेच मी उतरते. दुखापतीबाबत म्हणायचे तर सुधारणा होत आहे. पुढील दोन महिन्यात तंदुरुस्त होईन. माझे पुढील लक्ष्य २०१६ रिओ ऑलिंपिक आहे,’’ असे मेरी कोमने म्हटले. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे मेरी कोम जेजूत (दक्षिण कोरिया) होणा-या महिलांच्या जागतिक बॉक्सिंगला मुकली आहे. या स्पर्धेत विक्रमी पाच सुवर्ण तिच्या नावावर आहेत.
मेरीच्या अनुपस्थितीत पिंकी रानी आणि बंदी घातलेली सरिता देवीच्या जागी प्रियंका चौधरीला जागतिक स्पर्धेसाठीच्या १० सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे. मेरीसह नेमबाज हीना सिद्धू, स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल तसेच पॅरॉलिंपिकपटू (उंचउडी) गिरिशा होसेनगाराला मंगळवारी ‘हर्बललाइफ’तर्फे गौरवण्यात आले.