राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काश्मीर खो-यात दहशतवाद्यांना होणा-या आर्थिक रसदीच्या रॅकेटसंदर्भात शनिवारी मोठी कारवाई केली.
नवी दिल्ली- राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काश्मीर खो-यात दहशतवाद्यांना होणा-या आर्थिक रसदीच्या रॅकेटसंदर्भात शनिवारी मोठी कारवाई केली. काश्मीरमध्ये १४ ठिकाणी तर दिल्लीत आठ ठिकाणी एनआयएने छापे टाकले.
‘‘दिल्ली-हरयाणातील आठ ठिकाणी आणि काश्मीरमधील १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले,’’ असे एनआयएच्या सुत्रांनी सांगितले. या प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर शुक्रवारी रात्री सर्वसाधारण गुन्हा नोंदविण्यात आला. हवाला ऑपरेटर्स, फुटीरतावादी नेत्यांची घरे, कार्यालये आणि व्यावसायिक ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. राजधानी दिल्लीतील सुमारे आठ हवाला ऑपरेटर्स आणि व्यापा-यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
काश्मीर खो-यातील विविध ठिकाणांहून सुमारे दिड कोटी रुपये आणि लष्कर-ए-तोयबा व हिजबूल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे लेटरहेड आणि अन्य काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. एनआयएमार्फत नोंदवण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवालात अद्याप कोणत्याही फुटीरतावादी नेत्याची नावे नमूद केली नसली तरी हुर्रियत कॉन्फरन्स, हिजबूल मुजाहिदीन, दुखतरन-ए-मिल्लत, लष्कर-ए-तोयबा तसेच पाकिस्तानस्थित जमात-ऊद-दवा या संघटनेचा म्होरक्या हाफिझ सईद यांची नावे या एफआयआरमध्ये नमूद आहेत.
फुटीरतावादी नेते नईम खान, फारूख अहमद आणि गाझी जावेद बाबा या तीन नेत्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर हे छापे टाकण्यात आले. २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईद याच्याकडून या तीन नेत्यांना आर्थिक निधी पुरवण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
या फुटीरतावाद्यांच्या ठिकाणांवर छापे
काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शहा गिलानी यांचे समर्थक आणि आप्तस्वकीय आणि त्यांचा जावई फन्टूश यांच्या घरांवर एनआयएने शुक्रवारी छापे टाकले. व्यावसायिक झहूर वताली, शाहिद-ऊल-इस्लाम, ‘अवामी अॅक्शन कमिटी’चे नेते नईम खान आणि हुर्रियतचे नेते राजा कलवाल यांच्या श्रीनगर येथील घरांवरही एनआयएने छापे टाकले.