दाऊद इब्राहिम टोळीचा कुख्यात गुंड आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेसह १८ गंभीर गुन्ह्यांसाठी हवा असलेला श्यामकिशोर गरिकापट्टी याला गोवा पोलिसांनी रविवारी अटक केली.
पणजी – दाऊद इब्राहिम टोळीचा कुख्यात गुंड आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेसह १८ गंभीर गुन्ह्यांसाठी हवा असलेला श्यामकिशोर गरिकापट्टी याला गोवा पोलिसांनी रविवारी अटक केली.
मूळचा पुण्याचा असलेला गरिकापट्टी हा गेली २० वर्षे दाऊद टोळीत काम करत आहे. पणजीपासून १० किलोमीटरवरील साळीगाव गावातून त्याला पोलिसांनी अटक केली. गेल्या आठ वर्षापासून तो या गावात बनावट नावाने राहत होता. त्याच्याकडे पिस्तूल व बनावट ओळखपत्रही सापडले आहे, असे पोलीस अधीक्षक कार्तिक काश्यप यांनी सांगितले.
१९९३च्या बॉम्बस्फोटप्रकरण गरिकापट्टीला अटक झाली होती. २००३मध्ये मिळालेल्या पॅरोलचा फायदा घेत तो फरार झाला होता. गुन्हेगारी जगतात ‘काळा विंचू’ या नावाने प्रसिद्ध असलेला गरिकापट्टीने जे. जे. रुग्णालयात गोळीबार घडवला होता.
१९९१ मध्ये वडराई गावात चांदीची बोट फुटली होती. तेथील गावक-यांकडून ही चांदी परत मिळवण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्यातही त्याचा सहभाग होता. त्याच्या नावावर अनेक हत्येचे गुन्हे दाखल आहेत.