जगभरातील शहरांमध्ये आवाजाचे प्रदूषण वाढत चालले आहे. ते मोजणारे नवीन अॅप्स ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या संशोधकाने तयार केले आहे.
माणसाच्या विविध सोयी-सुविधा देण्याचा स्मार्टफोनमुळे उपलब्ध होऊ लागल्या आहेत. रेल्वे, विमानाचे तिकिट, हवामान, फॅशन आदी सर्व सुविधा मोबाइलवरून मिळतात. जगभरातील शहरांमध्ये आवाजाचे प्रदूषण वाढत चालले आहे. ते मोजणारे नवीन अॅप्स ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या संशोधकाने तयार केले आहे. यामुळे शहरातील आवाजाचे प्रदूषण मोजणे शक्य होणार आहे.
कॉमनवेल्थ वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था आणि न्यू साउथ वेल्स विद्यापीठाने डॉ. राजीब राणा यांच्या नेतृत्वाखाली ‘इयर फोन’नावाचे नवीन अॅप्स तयार केले आहे. यामुळे शहरातील आवाजाचे तपशीलवार नकाशे तयार करण्यात येणार आहेत. तसेच अधिक आवाजाची क्षेत्रे हुडकून काढण्याचे काम हे अॅप्स करणार आहे.
शहराचे नियोजन करताना आवाजाचे प्रदूषण ही मोठी बाब आहे. शाळा बांधायची असल्यास आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्रासाठी ही महत्त्वाची बाब आहे.
ध्वनिप्रदूषणाचा मानसिक तणावाशी जवळचा संबंध आहे. यामुळे शांत झोप न लागणे, कमी ऐकू येणे, मानसिक थकवा आदी परिणाम होत असतात, असे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने सांगितले.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाइल फोनचा वापर करून आवाजाची पातळी टिपता येऊ शकते. तसेच नवीन स्मार्टफोनमधील सेन्सर्स हे माहिती टिपण्यात अधिक सक्षम असतात, असे राणा यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियातील मोठय़ा शहरांमधील रस्त्यांवर या ‘अॅप्स’ची चाचणी केली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर याचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे.