मराठी रंगभूमीला दीडशेहून अधिक कालखंडाचा वारसा आहे. या समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी रंगभूमीवर अनेक प्रयोग केले गेले आणि आजही नवनवे प्रयोग सातत्याने होत आहेत. त्याच परंपरेचा सार्थ अभिमान बाळगून मुंबईतल्या खारदांडा येथील hive नावाच्या कलाअवकाशात ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान दररोजची संध्याकाळ नाटयमयरीत्या साजरी केली जाणार आहे. या चार नाटयसंध्योत्सवाबद्दल..
खारदांडा परिसरात वेगवेगळे उपक्रम राबवणारी एक संस्था उदयास आली आहे. hive तिचे नाव. या जागेत विविध पद्धतीचे कलाविषयक उपक्रम राबवले जात असतात. हे तरुणांच्या आकर्षणाचे एक नवे केंद्र ठरत आहे. साधारण वर्षभराच्या अल्पावधीतच ही जागा रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. या संस्थेने ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान एक आगळावेगळा नाटय़ोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. या चारही संध्याकाळी रंगमित्रांची मैफल रंगणार असून, नव्या-जुण्या रंगमित्रांची मैत्री घट्ट करण्याचे काम हा उपक्रम करणार आहे.
ज्येष्ठ नाटककार शफाअत खान, प्रख्यात दिग्दर्शक रवींद्र लाखे, अभिनेते संदीप पाठक, अभिनेत्री प्रिया जामकर यांच्या सोबतच तरुण नाटककार स्वप्नील चव्हाण, ओंकार भाटकर आदी ज्येष्ठ, युवा आणि नवोदित रंगमित्र आपल्या मैत्रीची विण या चार नाटयसांजांमधून गुंफणार आहेत.
५ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजता उद्घाटनाचे सत्र होईल. त्यात प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना धनश्री खंडकर यांच्या सादरीकरणाने पहिले पुष्प या महोत्सवात गुंफले जाणार आहे. त्याच दिवशीच्या दुस-या सत्रात ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांचे व्याख्यान होणार आहे. यात शफाअत खान समकालीन रंगभूमीबद्दलची आपली निरीक्षणे मांडतील. त्यानंतर रात्री ८.३० ते १० या वेळेत तरुण नाटककार स्वप्नील चव्हाण आपल्या नव्या नाटकाचे अभिवाचन करणार आहेत.
तरुण रंगमित्रांसाठी येथे ‘खुला मंच’ असणार आहे. यात रंगकर्मींना थेट सहभागी होता येणार आहे. आपापले कलाविष्कार सादर करता येणार आहेत. त्याला वेळेचे बंधन राहणार नाही. हा ‘खुला मंच’ चारही दिवस सुरू राहणार असल्याने त्याला साहित्य संमेलनात कवींना जसा ‘खुला मंच’ मिळतो आणि उत्साही कवी आपल्या काव्य सादरीकरणातून मान्यवरांचे लक्ष वेधून घेतात, तसेच आपले नाटयगुण दाखवण्याचा हा आगळावेगळा उपक्रम उत्साही तरुणाईला प्रोत्साहित करणारा ठरणार आहे.
दुस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात संध्याकाळी ६ ते ७.३० वाजतादरम्यान नाटककार ओंकार भाटकर हे आपल्या नव्या नाटकाचे वाचन करतील. दुस-या सत्रात संध्याकाळी ८ ते १०.३० वाजतादरम्यान संदीप पाठक ‘व-हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री नाटकाचा प्रयोग सादर करणार आहेत. तिस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात संध्याकाळी ५ ते ६.३०दरम्यान नव्या रंगकर्मीचा मुक्त आविष्कार रंगणार आहे. त्यानंतरच्या सत्रात ७.३० ते ९.३०दरम्यान ‘अंतर्नाद’ या कथा, कवितांच्या सादरीकरणाची मैफल रंगणार आहे.
८ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ ते ८ या पहिल्या सत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक रवींद्र लाखे आणि अभिनेत्री प्रिया जामकर हे कमल देसाई यांच्या कथांवर आधारित ‘रंग कमळ’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. ८.३० ते १०.३० या अखेरच्या सत्रात हेमंत हजारे दिग्दर्शित दोन एकल नाटयाविष्कार सादर होणार आहेत. यात अभिनेते सुनील जोशी आणि धनश्री करमरकर नाटय सादर करतील.
या उपक्रमावर नजर टाकली तर नाटयकलेशी निगडित वेगवेगळ्या कलांचा आविष्कार इथे होणार आहे. नृत्य, काव्य, अभिनय, कथा अशा वेगवेगळ्या कला नाटकाशी नाते सांगणार आहेत. नाटकात सगळ्याच कलांना आपल्यात सामावून घेतले आहे. मग ते संगीत असो की स्थापत्य, हे नाटय सादरीकरण समृद्ध होण्याची गरज असते. ‘हाईव्ह’ या संस्थेने या चार सांजा नाटकाशी वेगवेगळ्या कलांशी सांधण्याचा प्रयत्न केला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये!