स्पेनच्या नाडालला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवत सर्बियाच्या नोवाक जोकोविचने चायना ओपनचे जेतेपद राखले.
बीजिंग – स्पेनच्या नाडालला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवत सर्बियाच्या नोवाक जोकोविचने चायना ओपनचे जेतेपद राखले. अव्वल रॅँकिंग हुकल्याचा राग जोकोविचने रविवारी झालेल्या नाडालविरुद्धच्या ‘फायनल’मध्ये काढला.
जोकोविचचे चायना ओपनमधील गेल्या पाच वर्षामधील चौथे जेतेपद आहे. एटीपी रॅँकिंगमध्ये जोकोविचला मागे टाकून नाडाल अव्वल रॅँकिंगवर झेप घेतली. सोमवारी (७ ऑक्टोबर) अधिकृतपणे यावर शिक्कामोर्तब होईल. अर्थात अव्वल रॅँकिंग आणि चायना ओपन जेतेपदाचा संबंध नव्हता. त्यामुळे जेतेपद पटकावून ‘दुहेरी’ आनंद साजरा करण्याची नाडालची संधी हुकली तरी नाडाल अव्वल स्थान अबाधित आहे.
याउलट जोकोविचने नाडालची हार्डकोर्टवरील विजयी घोडदौडही संपुष्टात आणली. गेल्या दोन महिन्यांत जोकोविचला नाडालकडून सिनसिनाटी एटीपी मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तसेच त्यानंतर अमेरिकन ओपन ग्रॅँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते.
सेरेनाच अव्वल
अव्वल मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने रविवारी आठवी मानांकित सर्बियाच्या येलेना यान्कोविचला ६-२, ६-२ असे नमवत चायना ओपनमध्ये महिला एकेरीचे जेतेपद आपल्या नावे केले. या स्पर्धेत तिने एकही सेट न गमावता हार्डकोर्टवरील दमदार फॉर्म कायम ठेवला. सेरेनासाठी यंदाचे वर्ष फलदायी ठरले आहे. फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन ग्रॅँडस्लॅम शिवाय तिने सात डब्ल्यूटीए स्पर्धा जिंकल्यात. चायना ओपन हे सेरेनाचे कारकीर्दीतील ५६वे जेतेपद आहे.