अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांना कांस्यपदक
जकार्ता – नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांच्या चमकदार कामगिरीमुळे २०१८ आशियाई स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी भारताला पदकांचे खाते उघडता आले.
अपूर्वी आणि रवी याने १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारामध्ये तिसरे स्थान मिळवले. भारताच्या जोडीला ४२९.९ गुण मिळवता आले. या प्रकारामध्ये तैवानने (४९४.१ गुण) सुवर्ण कामगिरी केली. त्यांची ही विक्रमी कामगिरी ठरली. ‘फेवरिट’ चीनला (४९२.५ गुण) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दक्षिण कोरिया संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. अपूर्वी चंडेलासह रवी कुमारने कांस्यपदक मिळवले तरी अव्वल दोन जोडय़ा आणि त्यांच्यामध्ये जवळपास ६५ गुणांचा फरक आहे.
पवन कुमारने पदकाची संधी गमावली
भारताचा आणखी एक कुस्तीपटू पवन कुमार याने पदकाची संधी गमावली. पुरुषांच्या
८६ किलो फ्रीस्टाइल प्रकारामधील कांस्यपदकाच्या लढतीत त्याला मंगोलियाच्या ओगरेडोल युइटुमेनकडून ०-६ असा पराभवाचा धक्का बसला.
पहिले सुवर्ण चीनला
१८व्या आशियाई स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवण्याचा मान चीनने मिळवला. वुशू प्रकारात पुरुष गटात सुत पियुयान याने ही करामत साधली. २८ वर्षीय सुन याने चांगक्वान या प्रकारात ९.७५ गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले. यजमानांच्या एडबर झेवियर माव्र्हेलो याला रौप्यपदक मिळाले. तैवानच्या सॅइ सेमिन याने कांस्यपदक मिळवले.
चीनचे वर्चस्व
पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे चीनने वर्चस्व राहिले. चीनी खेळाडूंनी ७ सुवर्णासह १६ पदके पटकावली. त्यात ५ रौप्य आणि ४ कांस्यपदकांचा समावेश आहे. जपान (३ सुवर्णासह १४ पदके) आणि दक्षिण कोरिया (२ सुवर्णासह १० पदके) अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान राखले. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये भारतासह कझाकस्तान, इंडोनेशिया, चायनीज तैपेइ (तैवान), थायलंड), उझबेकिस्तान आणि मंगोलिया (प्रत्येकी १ सुवर्ण) या देशांचा समावेश आहे. पहिल्या दिवसअखेर एक सुवर्ण आणि तितकेच कांस्य अशा दोन पदकांसह भारत सातव्या स्थानी आहे.
सुशील कुमार म्हणतो, अनपेक्षित पराभव
पहिल्या फेरीतील पराभव अनपेक्षित होता, असे ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार याने म्हटले. ‘‘पराभव अनपेक्षित होता. रविवारी मला खेळ उंचावता आला नाही. पराभवासाठी मी कुठलेही कारण सांगणार नाही. माझ्या बाजूला ५७ किलो गटातील विजेता बसला होता. हरल्याचे त्याने मला सांगितले. मी त्याला म्हटले काळजी करू नको. हार-जीत हा खेळाचा भाग असतो. मात्र दमदार पुनरागमन करेन,’’ असे सुशीलने सांगितले.
पुरुषांच्या ७४ किलो गटामध्ये पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात सुशील कुमार याला बहारिनच्या अडॅम बॅटिरोव्हकडून ३-६ असा पराभवाचा धक्का बसला. जॉर्जियामध्ये झालेल्या टिब्लिसी ग्राँप्रिमध्ये सुशील याला सलामीला पराभवाचा धक्का बसला होता. त्याचा मागील चार वर्षातील हा पहिलाच पराभव होता. मात्र आशियाई स्पर्धेतील पराभवाने सुशीलच्या फॉर्म आणि फिटनेसबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
..तर रिपचाज फेरीत खेळण्याची संधी
बहारिनचा बॅटिरोव्ह याने अंतिम फेरी गाठली तर सुशील कुमार याला रिपचाज फेरीत खेळण्याची संधी मिळेल. त्यात खेळ उंचावल्यास किमान कांस्यपदकाची आशा बाळगता येईल.
वुशू – परदीप कुमार उपांत्यपूर्व फेरीत
भारताच्या परदीप कुमार याने वुशूमध्ये पुरुष सांडा प्रकारात ७० किलो गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने तजिकिस्तानच्या कुर्शेड्झोडा मिझरेडालेरखोन याच्यावर २-० अशी मात केली.
कबड्डी – पुरुष संघाचा सलग दुसरा विजय
भारताच्या पुरुष कबड्डी संघाने पहिल्या दिवशी सलग दोन विजय मिळवले. ‘अ’ गटातील दुस-या लढतीत भारताने श्रीलंकेला ४४-२८ असे रोखले. तत्पूर्वी, सलामीला बांगलादेशचा ५०-२१ असा धुव्वा उडवला.
जलतरण – सजन प्रकाश पाचवा
जलतरणामध्ये पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात भारताचा सजन प्रकाश पाचवा आला. त्याला १:५७.७५ अशी वेळ नोंदवता आली.
हॉकीमध्ये विजयी सुरुवात
भारताने महिला हॉकीमध्ये सर्वोत्कृष्ट सुरुवात करताना गटवार साखळीतील पहिल्या लढतीत यजमान इंडोनेशियाचा ८-० असा धुव्वा उडवला. मध्यंतराला भारताने ६-० अशी आघाडी घेतली होती. वंदना कटारिया आणि गुरजीत कौर विजयात चमकल्या.
महिला बास्केटबॉल संघाचा
सलग दुसरा पराभव
भारताच्या महिला बास्केटबॉल संघाला गटवार साखळीमध्ये सलग दुसरा पराभव पाहावा लागला. ‘अ’ गटातील दुस-या लढतीत चायनीज तैपेइकडून (तैवान) ६१-८४ असे पराभूत व्हावे लागले. तत्पूर्वी, सलामीला कझाकस्तानकडून ६१-७९ अशी मात खावी लागली. गटवार साखळीतील पुढील लढतीमध्ये सोमवारी भारताची गाठ संयुक्त कोरियाशी पडेल. त्यानंतर शेवटच्या लढतीमध्ये २३ ऑगस्टला यजमान इंडोनेशिया यांच्याशी झुंजावे लागेल.
बॅडमिंटन – पुरुषांचा मालदिववर विजय
भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूंनी दमदार सुरुवात मालदिववर ३-० असा विजय मिळवला. रामनाथन-सुमीतची जोडी टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत रामकुमार रामनाथन हा सुमीत नागल याच्यासोबत झुंजेल. यातील पहिली जोडी रोहन बोपण्णा आणि दिविज शरन ही आहे. पुरुष एकेरीमध्ये रामकुमार रामनाथन आणि प्रज्नेश गुनीस्वरन भारताचे प्रतिनिधित्व करतील. मिश्र दुहेरीत अंकिता रैना आणि कामरान ठंडी अनुक्रमे बोपण्णा आणि शरनसोबत खेळतील.