राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या नेमबाजांची सोमवारी सोनेरी कामगिरी झाली.
थिरुवनंतपूरम- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या नेमबाजांची सोमवारी सोनेरी कामगिरी झाली. अंजली वेदपाठकचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या महिलांनी १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकवले. त्याशिवाय महाराष्ट्राच्या पूजा घाटकरने महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकवले.
त्याच प्रकारात मुंबईच्या अयोनिका पॉलने रौप्यपदक मिळवले. अपूर्वी चंडेलाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पोलीस अकादमी शूटिंग रेंजवर ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे नेमबाजीतील प्रकार सुरू आहेत.
जलतरणात तीन पदके
२०० मीटर बटरफ्लाय (पुरुष) प्रकारात महाराष्ट्राच्या सौरभ सांगवेकरला कांस्यपदक मिळाले. महिलांमध्ये १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात महाराष्ट्राच्या ज्योत्स्ना पानसरेने रौप्यपदक मिळवले. २०० मीटर बटरफ्लाय महिलांमध्ये महाराष्ट्राच्या मौनिक गांधीने रौप्यपदक मिळवले.
ओंकार ओतारीचे पदक हुकले
पुरुषांच्या ६९ किलो वेटलिफ्टिंग प्रकारात महाराष्ट्राच्या ओंकार ओतारीचे पदक थोडक्यासाठी हुकले. त्याला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. कोल्हापूर जिलतील कुरुंदवाडच्या ओंकारने पहिल्या प्रयत्नानंतर अव्वल स्थान मिळवले होते. मात्र तिस-या प्रयत्नात तो अपयशी ठरला. तेव्हाच तो पदकाला मुकला. २७ वर्षीय ओंकारने ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत ६९ किलो वेटलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदक मिळवले होते.
सुशील कुमार उपस्थित
कुस्तीच्या लढतींवेळी ऑलिंपिक पदकविजेता सुशील कुमार उपस्थित होता. विजेत्यांनात्याच्या हस्ते गौरवण्यात आले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळांचे प्रकार हे ऑलिंपिकप्रमाणेच असतात. मात्र आयोजकांनी उद्घाटन आणि समारोप सोहळ्यांवर जास्त लक्ष केंद्रित केलेले दिसते. खेळ आणि क्रीडापटूंना तुलनेने आयोजकांनी महत्व कमी दिलेले दिसते. या स्थितीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा फायदा क्रीडापटूंपेक्षा कलाकारांना जास्त होणार आहे. – पी. टी. उषा (माजी धावपटू आणि प्रशिक्षक)