दोहा – भारताचा आघाडीचा खेळाडू पंकज अडवाणीने जागतिक बिलियर्डसमधील आपला झंझावात काय ठेवला आहे. रविवारी त्याने कारकिर्दीतील सतरावे जगज्जेतेपद पटकावले. दोहा येथे पार पडलेल्या आयबीएसएफ जागतिक बिलियर्डस अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत त्याने इंग्लंडच्या माइक रसेलचा ६-२ (०-१५५, १५०-१२८, ९२-१५१, १५१-०, १५१-६, १५१-०, १५०-५८, १५०-२१) असा फडशा पाडला. एखाद्या खेळात एवढी जगज्जेतेपदे पटकावणारा पंकज हा पहिलाच भारतीय ठरला आहे. पंकजने जेतेपद राखले असेच म्हणायला हवे; कारण गेल्यावर्षी बेंगळुरूत पार पडलेल्या या स्पर्धेत पंकजनेच बाजी मारली होती.
पंकजने सामन्याची सुरुवात सुमार केली. रसेलने पंकजवर पहिला ब्रेक मिळवला तो ०-१५५ असा एकतर्फी. अडवाणी दुस-या ब्रेकमध्ये बाजी मारली खरी; पण त्यातील फरक १५०-१२८ असा निसटता होता. ही चढाओढ पुढील ब्रेकमध्येही कायम होती. रसेलने हा ब्रेक खिशात टाकला होता; पण त्यानंतर पंकजने मागे वळून बघितले नाही.
सुरेख डावपेच, खेळावरील नियंत्रण, संयम असा मिलाफ साधत पंकजने बाजी मारली. पंकजला दुहेरी जगज्जेतेपद पटकावण्याची सुरेख संधी आहे; कारण सोमवारपासून बिलियर्डसमधील दीर्घ फॉरमॅटच्या जगज्जेतेपदाला सुरुवात होते आहे. पंकजने जगज्जेते पदापर्यंतच्या प्रवासात आपल्या भारतीय सहका-यालाही नमवले. उपांत्य फेरीत त्याने रुपेश शहावर ५-२, अशी मात केली होती. तर रसेलने सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टवर ५-१ असा विजय मिळवला होता.