चँपियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या मुख्य फेरीत गुरुवारी ‘ग्रुप बी’मध्ये आयपीएलमधील किंग्ज इलेवन पंजाब संघ ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट हरिकेनशी दोन हात करेल.
मोहाली– चँपियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या मुख्य फेरीत गुरुवारी ‘ग्रुप बी’मध्ये आयपीएलमधील किंग्ज इलेवन पंजाब संघ ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट हरिकेनशी दोन हात करेल.
नव्याने बांधणी केलेल्या जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखालील पंजाबने सातव्या हंगामात उपविजेतेपद मिळवले. प्रथमच चँपियन्स लीगसाठी पात्र ठरले असले तरी सातत्य राखण्यास ते उत्सुक आहेत. माजी कसोटीपटू संजय बांगर यांच्या प्रशिक्षकपदाखालील पंजाबची फलंदाजीची भिस्त सलामीवीर वीरेंदर सेहवागसह डेव्हिड मिलर, कर्णधार बेली तसेच वृद्धिमन साहा, मनन वोहरा आणि ऋषी धवनवर आहे.
गोलंदाजीत मध्यमगती लक्ष्मीपथी बालाजी, थिसरा परेरा आणि अक्षर पटेल असले तरी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनची अनुपस्थिती त्यांना जाणवेल. आयपीएलच्या सातव्या मोसमात १४ लढतींमध्ये त्याने १७ विकेट घेतल्या होत्या. मात्र बरगडीची दुखापत तसेच ऑस्ट्रेलिया बोर्डाकडून अद्याप ‘एनओसी’ न मिळाल्याने जॉन्सन सुरुवातीच्या टप्प्यात खेळण्याची शक्यता नाही.
टिम पेनच्या नेतृत्वाखालील होबार्ट हरिकेनची भिस्त ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डग बोलिंजर, इंग्लंडचा बेन हिल्फेनहाउस, पाकिस्तानचा शोएब मलिक आणि डावखुरा गोलंदाज झेवियर डॉहर्टीवर आहे. त्यांच्या दुस-या फळीत आयडेन ब्लिझार्ड आणि बेन डंकसारखे गुणवान क्रिकेटपटू आहेत.
वेळ : रा. ८ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३ वर.
नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सह लायन्स मुख्य फेरीत
न्यूझीलंडचा नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्ससह पाकिस्तानचा लाहोर लायन्सने मुख्य फेरीत प्रवेश केला. नॉर्दर्ननी तिन्ही लढती जिंकल्या. लाहोरने दोन विजयांसह दुसरे स्थान मिळवताना आगेकूच केली.
जेपी दुमिनी स्पर्धेबाहेर
गुडघ्याच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जेपी दुमिनी हा चँपियन्स लीग टी-२० स्पर्धेत खेळू शकणार नाही. झिम्बाब्वेत झालेल्या तिरंगी स्पर्धेदरम्यान दुमिनीला दुखापत झाली. चँपियन्स लीगमध्ये तो केप कोब्राज्चे प्रतिनिधित्व करणार होता.