रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघावर ६ विकेट आणि ८ चेंडू राखून विजय मिळवत किंग्ज इलेवन पंजाबने रविवारी आयपीएल-९मधील गुणांचे खाते उघडले.
मोहाली- रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघावर ६ विकेट आणि ८ चेंडू राखून विजय मिळवत किंग्ज इलेवन पंजाबने रविवारी आयपीएल-९मधील गुणांचे खाते उघडले. मुरली विजय (४९ चेंडूंत ५३ धावा) आणि मनन वोहरा (३३ चेंडूंत ५१ धावा) ही सलामी जोडी त्यांच्या विजयात चमकली.
पुण्याचे १५३ धावांचे आव्हान पंजाबने १८.४ षटकांत ४ विकेटच्या बदल्यात पार केले. विजय आणि वोहराने ९७ धावांची दमदार सलामी दिल्याने यजमान एकतर्फी विजय मिळवतील, असे वाटले.
मात्र सलामीवीर विजयसह ‘वनडाउन’ शॉन मार्श (४), कर्णधार डेव्हिड मिलरला (७) झटपट माघारी धाडताना लेगस्पिनर मुरुगन अश्विनने सामन्यात रंगत आणली.
शेवटच्या पाच षटकांमध्ये चेंडू आणि आवश्यक धावांमध्ये २०चा फरक होता. परंतु, मधल्या फळीतील ग्लेन मॅक्सवेलने १४ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३२ धावा फटकावताना १९व्या षटकात पंजाबचा विजय साजरा केला.
विजयने ४९ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह स र्वाधिक ५३ धावांचे योगदान दिले. त्याला मनन वोहराची चांगली साथ लाभली. त्याने २२ चेंडूंत ७ चौकारांसह ५१ धावांचे योगदान दिले. वोहरालाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
पुण्यातर्फे मुरुगन अश्विन (४-०-३६-३) अन्य प्रमुख गोलंदाचांनी निराशा केली. ऑफस्पिनर आर. अश्विनला एकही विकेट घेता आली नाही. तत्पूर्वी, मोहित (२३-३) आणि संदीप शर्मा (२३-२) या मध्यमगती जोडगोळीच्या अचूक मा-यासमोर पंजाबने रायझिंग पुणे सुपरजायंट्सला २० षटकांत ७ बाद १५२ धावांवर रोखले.
आघाडी फळी कोसळली तरी पुण्यातर्फे फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक ६७ धावांचे योगदान केले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (२६ चेंडूंत ३८ धावा) झटपट खेळीमुळे त्यांना दीडशेपार मजल मारता आली.
पंजाबने तीन सामन्यांत पहिला विजय नोंदवला. पुण्याचा तितक्याच सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. पंजाबपूर्वी नवोदित गुजरात लायन्सकडून त्यांना पराभूत व्हावे लागले.