बापदेव क्रीडा मंडळ आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्यावहिल्या रायगड कबड्डी लीग स्पर्धेत पनवेल टायगर्स संघाने विजेतेपद पटकावले.
अलिबाग- बापदेव क्रीडा मंडळ आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्यावहिल्या रायगड कबड्डी लीग स्पर्धेत पनवेल टायगर्स संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी मुरुड मॉन्स्टर संघावर २७-१३ अशा फरकाने विजय मिळवला. अलिबाग वॉरियर्स आणि कर्जत रायगड्स संघांनी अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक मिळवला.
पेझारीतील प्रभाकर पाटील क्रीडानगरीत मॅटवर झालेल्या कबड्डी लीगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. मात्र रविवारी झालेली अंतिम लढत एकतर्फी झाली. पनवेल संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखताना पूर्वार्धात १५-६ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही सातत्य राखताना त्यांनी आणखी आघाडी वाढवली.
पनवेलतर्फे त्रिशूल ठाकूर आणि महेश पाटीलने उत्कृष्ट चढाया केल्या. त्याला सुप्रेश म्हात्रेच्या पकडीची सुरेख साथ लाभली. मुरुडतर्फे केदार लाल आणि अनिकेत कोठेकर चमकले. तत्पूर्वी, पहिल्या उपांत्य फेरीत पनवेल संघाने अलिबाग वॉरियर्स तसेच मुरुड संघाने कर्जत रायगड्सचा पराभव केला.
पनवेलच्या त्रिशूल ठाकूरला लीगतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. मुरुडचा अनिकेत कोठेकरने उत्कृष्ट चढाई तसेच पनवेलच्या सुप्रेश म्हात्रेने उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार मिळवला. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा झाला.
यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार शांताराम जाधव, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, कार्याध्यक्ष जनार्दन पाटील, सहकार्यवाह जे. जे. पाटील, स्पर्धाप्रमुख संजय मोकल आदी मान्यवर उपस्थित होते.