वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या विस्कळीत झाल्या आहेत.
मुंबई- वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या विस्कळीत झाल्या आहेत. उपनगरीय गाड्या 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत आहेत.
सकाळी कार्यालयात जाण्याच्या ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या गोंधळामुळे चाकरमान्यांचे पुरते हाल झाले.
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे काही अंधेरी लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बोरीवली व विरार लोकलमध्ये प्रचंड गर्दी उसळली. दादर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. यामुळे महिला आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले.
या गोंधळामुळे चर्चगेटकडे येणा-या प्रवाशांचे जत्थेच्या जत्थे प्लॅटफॉर्मवर रखडलेले दिसत होते.
सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी रेल्वेने तातडीची पावले उचलली असून, लवकरच वाहतूक सुरळीत होईल असे रेल्वेचे म्हणणे आहे.