ऑफस्पिनर दिलरुवन परेराच्या पाच विकेटमुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेला चौथ्याच दिवशीच गुरुवारी एक डाव आणि २४८ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला.
मिरपूर – ऑफस्पिनर दिलरुवन परेराच्या पाच विकेटमुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेला चौथ्याच दिवशीच गुरुवारी एक डाव आणि २४८ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला. याबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाहुण्यांनी १-० आघाडी घेतली.
पहिल्या डावात ४९८ धावांनी पिछाडीवर पडलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव उपाहारानंतर २५० धावांत आटोपला. १ बाद ३५ धावांवरून दिवसाचा खेळ सुरू केल्यावर बांगलादेशच्या प्रमुख फलंदाजांनी घरच्या प्रेक्षकांसमोर सपशेल निराशा केली.
९ बाद १९७ या स्थितीत रुबेल हुसेन (१७) आणि अल अमिन हुसेनने (नाबाद ३२) शेवटच्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केल्यामुळे यजमानांना अडीचशे धावांचा टप्पा गाठता आला. दुसरीच कसोटी खेळताना ३१ वर्षीय परेराने (१०९ धावांत पाच विकेट) कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली. वेगवान गोलंदाज सुरंग लकमलनेही तीन विकेट घेतल्या.
पहिल्या डावात द्विशतक झळकवणारा पाहुण्यांचा अनुभवी फलंदाज माहेला जयवर्धनेलाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. उभय संघांतील दुसरी कसोटी चितगावमध्ये ४ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे.