दागिन्यांच्या दुनियेत रोज नवनवीन डिझाइन्सची भर पडते आहे. पारंपरिक पण आधुनिकतेचा स्पर्श असलेल्या दागिन्यांची मागणी वाढते आहे. पण हे दागिने कोणत्या कपडय़ांवर चांगले दिसतील, याची थोडक्यात माहिती.
आजकाल सगळ्यांना सुंदर आणि मॉडर्न दिसायचं असतं, याकडे महिला विशेष लक्ष देतात. आपल्या शरीराच्या बांध्यानुसार कोणते कपडे चांगले दिसतील याचा विचार तर केलाच जातो. त्याचबरोबर कोणते दागिने उठून दिसतात याचासुद्धा विचार केला जातो. सध्या बाजारात नवनवीने दागिने म्हणजेच अॅक्सेसरीज आले आहेत.
या अॅक्सेसरीजमुळे पेहरावामध्ये आधुनिकता आणता येते. काहींमध्ये फक्त खडय़ांचा वापर केलेला असतो तर काहींमध्ये मोत्यांचा वापर करून अॅक्सेसरीज तयार केलेल्या असतात. शुद्ध सोन्यात, किंवा कमी वजनाचे असोत की बेंटेक्स, कुंदन, इमिटेशनमधले दागिने असोत, ते घातल्याशिवाय स्त्रीला जामानिमा पूर्ण केल्यासारखं वाटत नाही. तसंच सणवार आले की महिला दागिन्यांची आवर्जून खरेदी करतात. मग ते दागिने खरे असो किंवा खोटे.
पण या अॅक्सेसरीज कशा आणि कोणत्या कपडय़ांवर घालाव्यात याच्या काही टिप्स:
»» तुम्ही वेस्टर्न स्टाइलचे कपडे जास्त घालत असाल तर त्यावर सध्या बाजारात मिळणारे स्टील, लाकूड, खडे, दगड आणि शिंपले यांचा वापर करून तयार केलेले दागिने घालू शकता. पण टीशर्ट घातला असेल तर त्यावर एखादी लाँग चेन आणि हातात वेगवेगळ्या रंगाचे कडी घाला. त्याने एक वेगळाच लुक येईल.
»» बारीक असणा-यांनी हेवी, जाडसर दागिने घालण्यापेक्षा मध्यम आकाराचे किंवा अगदी नाजूक असे दागिने घालावे. भरगच्च दागिने घातले तर स्वत:च्या वजनापेक्षा त्यांचं वजन जास्त जाणवेल. तसंच ते दिसायलाही चांगलं दिसत नाही.
»» बांगडय़ा घालण्याची आवड असेल पण वेस्टर्न स्टाइलच्या कपडय़ांवर भरपूर बांगडय़ा कशा काय घालणार असा प्रश्न पडत असेल त्यांनी वेस्टर्न स्टाइलचे कपडे घातले की त्याला थोड पारंपरिक लुक द्यावा. म्हणजे जीन्स घातली असेल तर, त्यावर एखादा शॉर्ट कुडता घाला. वेस्टर्न आणि पारंपरिक असं कॉम्बिनेशन करायचं असेल तर त्यावर रंगीत बांगडय़ा घाला. हल्ली धाग्यांचा वापर करून बांगडय़ा तयार केल्या जातात.
»» दागिन्यांमध्ये आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे कानातले. कानातल्यामध्ये अनेक प्रकार आले आहेत. मोराच्या पिसासारखे, गोलाकार, चौकोनी तसंच डायमंड आणि यासारखे अनेक प्रकार बाजारात आले आहेत. अनारकली स्टाइलमध्ये किंवा भरलेला ड्रेस असेल तर त्यावर मोठे आणि डिझायनर कानातले घालावे. सध्या झुमका प्रकारातल्या कानातल्यांची जास्त चलती आहे. जीन्स आणि टीशर्ट असेल तर त्यावर छोटे कानातले घालावे. बाजारात मिळणा-या निऑन रंगाच्या कानातल्यांना जास्त मागणी आहे. कुडता घातला असेल तर मोठे कानातले घालू शकता पण ते लटकन प्रकारातले घालू नका.
»» सध्या बोटात टो रिंग घालण्याची फॅशन आली आहे. या टो रिंगमध्ये वेगवेगळे रंगसुद्धा उपलब्ध आहेत. हे टो रिंग वेस्टर्न तसंच पारंपरिक कपडय़ांवरसुद्धा छान दिसतात.