अणवस्त्र वाहक पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची मंगळवारी सलग दुस-यांदा ओदिशाच्या चांदीपूर परीक्षण तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.
चांदीपूर – संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या अणवस्त्र वाहक पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची मंगळवारी सलग दुस-यांदा ओदिशाच्या चांदीपूर परीक्षण तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणा-या या क्षेपणास्त्राची ३५० कि.मी.पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.
पृथ्वी क्षेपणास्त्राने चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले. सोमवारप्रमाणे मंगळवाराही पृथ्वीने लक्ष्याचा अचूक वेध घेतला असे डीआरडीओच्या संचलाकांनी सांगितले. ही चाचणी नियमित सराव चाचणीचा एक भाग होती. क्षेपणास्त्राची क्षमता तपासण्यासाठी उपलब्ध साठयामधून कुठलेही एक क्षेपणास्त्र निवडून चाचणी घेण्यात येते. डीआरडीओच्या वैज्ञानिकांच्या देखरेखीखाली ही चाचणी झाली.
२००३ मध्ये पृथ्वी-दोनचा भारतीय सैन्य दलात समावेश करण्यात आला. पृथ्वी-२ हे डीआरडीओने विकसित केलेले पहिले स्वदेशी बनावटीचे अणवस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे. अशा चाचण्यांमुळे आपल्या ताफ्यातील शस्त्रास्त्रांची क्षमता स्पष्ट होते तसेच आपण संभाव्य धोक्यासाठी कितपत सज्ज आहोत ते स्पष्ट होते. पृथ्वी-दोन मध्ये पाचशे ते एकहजार किलोची सफोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.