भाजपाने तुम्हाला मत देण्यासाठी पैसे देऊ केले तर ते पैसे घ्या, पण मत मात्र आपच्या उमेदवारालाच द्या असे विधान आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केले.
नवी दिल्ली – भाजपाने तुम्हाला मत देण्यासाठी पैसे देऊ केले तर ते पैसे घ्या, पण मत मात्र आपच्या उमेदवारालाच द्या असे विधान आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. दिल्लीमधील राजकीय वातावरण तापत चालले असून, सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे.
निवडणुकीच्या काळात भाजपवाले तुमच्याजवळ येतील तुम्हाला पैसे देऊ करतील. नाही म्हणून नका ते पैसे घ्या पण मत मात्र आपच्याच उमेदवाराला द्या असे विधान केजरीवाल यांनी केले.
केजरीवाल एवढयावरच थांबले नाहीत तर, काही पक्ष तुमच्याजवळ आले नाहीत तर, तुम्ही त्यांचे कार्यालय गाठा आणि त्यांच्याकडून पैसे घ्या असे वक्तव्य त्यांनी केले. केजरीवालांच्या या विधानाचा भाजपानेही चांगलाच समाचार घेतला. भ्रष्टाचार विरोधी लढयाचे कार्यकर्ते आता स्वत:चा भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहेत. अरविंद केजरीवालांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली.