पाच नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान दिवाळीत यंदा फटाक्यांचा ‘जादा आवाज होणार नाही’ याची काळजी पोलीस घेणार आहेत. या सणादरम्यान सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, शांतताक्षेत्रात मर्यादेबाहेर १२५ डेसीबलपेक्षा मोठा आवाज होणारे फटाके वाजवल्यास कारवाई होणार आहे.
ठाणे – पाच नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान दिवाळीत यंदा फटाक्यांचा ‘जादा आवाज होणार नाही’ याची काळजी पोलीस घेणार आहेत. या सणादरम्यान सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, शांतताक्षेत्रात मर्यादेबाहेर १२५ डेसीबलपेक्षा मोठा आवाज होणारे फटाके वाजवल्यास कारवाई होणार आहे.
मोठा आवाज करणारे रशी बॉम्ब फटाके वाजवल्यास किंवा असे मोठय़ा आवाजाचे फटाके विक्रीवरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यावरही बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी हे निर्देश दर्शनी लावण्यात येणार आहे.
या बाबत ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ध्वनीक्षेपकावरूनही घोषणा व सूचना देण्यात येणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आठ दिवसांचा तुरुंगवास अथवा १ हजार २५० रुपये दंड, अथवा दोन्ही शिक्षा होतील, अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे.
धार्मिक किंवा देवदेवतांची चित्रे असलेले फटाके नको
ज्या फटाक्यांच्या आवरणावर किंवा आत कुठल्याही धर्माच्या देवदेवतांचे किंवा धार्मिक ग्रंथ इत्यादींचे फोटो, चित्र व मचकूर इत्यादी असेल की ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या फटाक्यांचे उत्पादन करू नये अथवा अशा प्रकारच्या फटाके विकू नयेत.अथवा अशा प्रकारच्या फटाक्यांचा साठा करू नये अथवा अशा प्रकारच्या फटाक्यांचा वापर करू नये. असेही पोलिसांनी कळवले आहे.
नुकसान होईल अशा फटाक्यांवर बंदी
नागरिकांना त्रास, नुकसान होईल असे फटाके उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रस्ते, इमारती किंवा इमारतीपासून ५० फुटांच्या आत प्रदर्शन, अग्नी पेटवण्यास किंवा दारुकाम करण्यास तसेच कुठलेही फटाके सोडण्यास तसेच उडवण्यास, फेकण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या अधिसूचनेच्या अंमलबजावणीत जनतेच्या सहकार्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. तडतडी (पुटपुटय़ा, नोटोमिक्स, चिरपुडी) वगरे नावाने ओळखले जाणारे यामध्ये क्लोरेट व पिवळा, पांढरा फॉस्फरस यांचे मिश्रण असते. उखडीबार, हवाई, डे आऊट, नाईट आऊट, रॉकेट, बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणा-या फटाक्यात अंशापेक्षा जास्त स्फोटक पदार्थ कागदात गुंडाळलेले दोरीने बांधलेले असतात.
तसेच बेकायदा म्हणून नोंद झालेले फटाके फोडणे, विक्री करणे, बाळगण्यावरही बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच फटाक्यांची हातगाडी, खुल्या ठिकाणी, तसेच धोका निर्माण होईल अशा ठिकाणी साठा किंवा विक्रीवरही बंदी आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.