आठ वर्षाच्या कारकीर्दीत ऐतिहासिक ऑलिंपिक पदक आणि जवळपास डझनभर सुपर सीरिज आणि ओपनची जेतेपदे तसेच जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी झेप घेतलेली सायना म्हणजे भारताच्या बॅडमिंटनच नव्हे तर क्रीडा संस्कृतीसाठी मिळालेली एक दैवी देणगी आहे. मात्र गेल्या दीड वर्षात भारताच्या या ‘फुलराणी’ला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २४ वर्षीय सायनाचे रँकिंग खूपच घसरलेय. सध्या ती आठव्या स्थानी आहे. सायनाची खालावलेली कामगिरी भारतीय बॅडमिंटनससह तिच्या चाहत्यांसाठी चिंतेची बाब ठरलीय.
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जानेवारीत झालेली इंडिया ग्राँप्री जिंकून मागील १५ महिन्यांतील अपयशाला पूर्णविराम दिला. नव्या वर्षाची आश्वासक सुरुवात करण्यात यश आले तरी त्यानंतर झालेली ऑल इंग्लंड सुपर सिरिज तसेच स्विस ओपन या स्पर्धात जगभरातील अव्वल बॅडमिंटनपटूंसमोर सायनाचे काहीच चालले नाही. दोन्ही स्पर्धात उपांत्यपूर्व फेरीतच तिचे आव्हान संपुष्टात आले. ऑल इंग्लंड सुपर सिरिज ही प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मायदेशातील ग्राँप्री जिंकल्याने सायनाचा आत्मविश्वास उंचावला होता, मात्र आठव्यांदा सहभागी झालेल्या सायनाची झेप उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच गेली. चीनची अव्वल बॅडमिंटनपटू शिक्सियन वँगकडून तिला एकतर्फी लढतीत पराभूत व्हावे लागले. यापूर्वी २०११ आणि २०१२ असे दोन वेळा जिंकलेल्या सायनाला स्विस ओपनमध्ये यंदा सहावे सीडिंग होते. मात्र या माजी विजेतीला पुन्हा एकदा चीनची भिंत भेदण्यात अपयश आले. त्यावेळच्या अव्वल सीडेड चीनच्या वँग यिहानविरुद्ध सायनाला सहज हार पत्करावी लागली. अव्वल आणि चीनच्याच बॅडमिंटनपटूंकडून मार खाण्याची सायनाची सलग दुसरी वेळ होती.
सायनासाठी मागील वर्ष (२०१३) खूपच वाईट गेले. जागतिक बॅडमिंटन फेडरेशनच्या (बीडब्लूएफ) १४ सुपर सिरिज तसेच चार ग्राँप्रि गोल्ड आणि ग्राँप्रि स्पर्धात तिला अंतिम फेरीही गाठता आली नाही. इंडोनेशिया सुपर सिरिज प्रिमियरमध्ये गतविजेती सायनाला उपांत्य फेरीतच बाहेरचा रस्ता धरावा लागला. हीच स्पर्धा तिने २००९-२०१० आणि २०१२ मध्ये जिंकली होती. सिंगापूर आणि डेन्मार्क ओपन सुपर सीरिजमध्ये गतविजेती सायना उपांत्यपूर्व फेरीतच बाहेर फेकली गेली. परदेशाप्रमाणे मायदेशातही तिने निराशा केली. इंडिया सुपर सिरिजमध्ये दुस-याच फेरीत तिला गाशा गुंडाळावा लागला. इंडिया ओपन ग्राँप्रिमध्ये सायनाने भाग घेतला नाही. खेळात हार-जीत असतेच. त्यामुळे पराभवाने खचून जाता कामा नये. पराभवातही शान असायला हवी. म्हणजेच तुम्ही प्रतिस्पध्र्याला सहजासहजी जिंकू न देता चुरस द्यायला हवी. सायनाबाबत नेमके हेच होत नाही. सायना एकतर्फी हरतेय. तिच्यासारख्या अव्वल दहामधील बॅडमिंटनपटूकडून नक्कीच अशी अपेक्षा नाही. सायनावर भारताची भिस्त आहे. तसेच ती अन्य बॅडमिंटनपटूंसाठी आदर्शही आहे. त्यामुळे तिच्या कामगिरीवर तिचे वैयक्तिक यश आणि भारताची कामगिरी ठरते.
२०१० आणि २०१२ वर्ष सायनासाठी खूपच यशस्वी ठरले होते. सध्या २०१४ वर्ष सुरू आहे. मागील कामगिरी पाहता यंदा सायना पुन्हा बहरात यायला हवी. मात्र तिचे काही चुकतेय. मलेशियाचे महान बॅडमिंटनपटू रशिद सिदेक यांनी सायनाच्या खेळाचे केलेले निरीक्षण आणि त्यावर व्यक्त केलेले मत खूपच महत्त्वाचे आहे. दस्तुरखुद सायनाने त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. ‘‘जागतिक क्रमवारीसह आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी सायनाने शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा अधिक सक्षम होण्याची आवश्यकता आहे. चीन आणि मलेशियामधील अव्वल बॅडमिंटनपटूंशी दोन हात करायचे असतील तर तुम्हाला सर्व आघाडय़ांवर ‘फिट’ राहण्याची गरज आहे,’’ असे सिदेक म्हणाले. केवळ सायना नव्हे तर युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने स्वत:ला सक्षम बनवण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले. सायना असो किंवा सिंधू, पुढील अनेक वर्षे त्यांना चीन, मलेशियाच्या अव्वल बॅडमिंटनपटूंशीच दोन हात करावे लागतील. आंतरराष्ट्रीय जेतेपद मिळवण्यासाठी तसेच जागतिक क्रमवारीत (रँकिंग) स्थान उंचावण्यासाठी चीन, मलेशियासह इंडोनेशिया आणि जर्मनीच्या बॅडमिंटनपटूंना हरवण्याशिवाय पर्याय नाही. या मातब्बर आणि अव्वल प्रतिस्पध्र्याविरुद्ध सायना नेहमीच पिछाडीवर राहिली आहे. सध्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली लि झ्युरुइविरुद्ध ती २-५ अशा पिछाडीवर आहे. दुस-या चीनच्याच यिहान वँगविरुद्धही (१-६) तिचे काहीच चाललेले नाही. तिस-या रँकिंगवरील शिक्सियन वँगसह (४-२) थायलंडची रॅचनॉक इंटेनॉन (४-३) तसेच जर्मनीची ज्युलिएन शेंकवर (८-४) सायनाने वर्चस्व गाजवलेय. एकूणच काय सायनाच्या जेतेपदाआड चीनची भिंत येतेय. चीनच्या बॅडमिंटनपटूंना तिने यापूर्वी हरवलेय. मात्र त्याची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता आहे.
मागील चुका सुधाराव्यात. तसेच त्यातून बोध घ्यावा, असा सल्ला राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांनी त्यांची सर्वात आवडती शिष्या सायनाला दिला आहे. सायनाचे दमदार पुनरागमन व्हावे म्हणून गोपिही उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी तिच्या सराव आणि प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात बदल केलाय. २४ वर्षीय सायनाचा ‘नेट’जवळ चांगला खेळ होत नाही. तिच्या स्मॅश आणि फोरहँड फटक्यांमध्येही तितकी अचूकता नाही. त्याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे सायनाला शारीरिक तंदुरुस्ती राखणे, जड जातेय. प्रत्येक क्रीडापटूला ‘बॅडपॅच’मधून जावे लागते. त्यातून सध्या ती जात आहे. सायना एक मेहनती बॅडमिंटनपटू आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक फिटनेसवर मात करणे, तिला सहज शक्य आहे. तो सुदिन लवकर येवो, हीच अपेक्षा.