अव्वल सीडेड आणि गतविजेता सर्बियाचा नोवाक जोकोविच पुन्हा एकदा माजी विजेता आणि दुसरा सीडेड स्वित्झर्लंडलडचा रॉजर फेडररसाठी भारी ठरला.
लंडन- अव्वल सीडेड आणि गतविजेता सर्बियाचा नोवाक जोकोविच पुन्हा एकदा माजी विजेता आणि दुसरा सीडेड स्वित्झर्लंडलडचा रॉजर फेडररसाठी भारी ठरला.
रविवारी ऑल इंग्लंड क्लबवर झालेल्या महाअंतिम फेरीत जोकोविचने फेडररचे आव्हान ७-६(७/१), ६-७(१०/१२), ६-४, ६-३ असे मोडीत काढले.
२८ वर्षीय जोकोविचने पहिला सेट जिंकून आघाडी घेतली. मात्र ३३ वर्षीय फेडररने दुस-या सेटमध्ये बाजी मारताना सामन्यात रंगत आणली.
‘टायब्रेकर’वर गेलेल्या सुरुवातीच्या दोन्ही सेटमुळे ‘फायनल’च्या निकालासाठी पाचव्या सेटची वाट पाहावी लागणार, असे वाटत होते. मात्र जोकोविचने तिस-या आणि चौथ्या सेटमध्ये फेडररची सव्र्हिस मोडीत काढताना सलग दुस-या आणि एकूण तिस-या जेतेपदावर नाव कोरले.
गेल्या वर्षीही दोघे आमनेसामने होते. त्यात जोकोविच सरस ठरला होता. यंदा त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. विम्बल्डनमध्ये विक्रमी आठव्या जेतेपदासह ऑल इंग्लंड क्लबवरील सर्वात वयस्कर विजेता बनण्याचे फेडररचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
विक्रमी १७ जेतेपदे पटकावणा-या या महान टेनिसपटूला सलग दुस-या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणा-या जोकोविचने विम्बल्डनमध्ये सातत्य राखताना या मोसमातील जेतेपदांची संख्या दोनवर नेली. फ्रेंच ओपनमध्ये स्वित्झर्लंडलडच्या स्टॅनिस्लास वावरिंकाकडून पराभूत व्हावे लागले नसते तर यंदा जोकोविचची जेतेपदांची हॅटट्रिक पूर्ण झाली असती.
तीन तासांच्या झुंजीमध्ये फेडररला नमवल्यानंतर जोकोविचने सेंटर ग्रास कोर्टचा तुकडा तोडून खात विजयाचा आनंद साजरा केला. सर्बियाची तशी परंपरा आहे.