कॉलेज लाईफमधल्या मित्र-मैत्रीणींसोबत केलेल्या धमाल-मस्तीला खरं तर तोडच नसते. लेक्चर्स, प्रोजेक्ट्स हे शिक्षकांसाठी असतात, आपले मात्र हे दिवस फिरण्याचेच आहेत असा लेक्चर बंक करणा-या मुलांचा समज असतो. पण ही मज्जा कधीतरी सजा ठरू शकते. मित्रमैत्रीणींबरोबर जितकी मज्जा केली जाते त्यापेक्षा जास्त गरज अभ्यासाची असते. त्यामुळे लेक्चर बंक मारून कॉलेज लाईफ एन्जॉय करताना अभ्यासात मागे पडणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी.
कॉलेज बंक करून चकाटया मारत फिरणं ही कॉलेजिअन्सची खासियत. कधी बीचवर जाऊन तर कधी मित्राच्या घरी बसून केलेला टीपी म्हणजेच टाईमपास, तर कधी मुव्हीचा बेत, या सगळ्या गोष्टींसाठी तरुणाई लेक्चर्स बंक करते. सकाळी सातपासून लेक्चर्स असतील तर सकाळी सकाळी कुठे जायचं म्हणून तरुणाई थेट बीचवर जाण्याला पसंती देते. मग कॉलेजपासून जवळ असणारा कोणताही बीच चालतो.
गोराई बीच ते वरळी सी फेसपर्यंतचा कोणताही बीच चालतो. सकाळी फारशी गर्दी नसल्यामुळे पूर्ण बीच आपलाच म्हणून बिनधास्त मस्ती केली जाते. कोवळं ऊन डोक्यावर असेपर्यंत या बीचवर सकाळचा नाश्ता आणि मग नंतर पाण्यात धम्माल. सकाळी स्वच्छ आंघोळ केलेली असतानासुद्धा त्या बीचवरच्या अस्वच्छ पाण्यात जाऊन एकमेकांवर पाणी उडवण्यात एक वेगळीच मजा असते. बरं, आता या बीचच्या सफरीनंतर थोडा कंटाळा आला असेल तर एखाद्या झाडाच्या आडोशाखाली बसून सटरफटर काहीतरी खात बसायचं. त्यानंतर सरळ मुव्हीचा बेत आखायचा म्हणजे पायांना जरा विश्रांती मिळते. त्यानंतर आणखी काही तरी बेत नाहीतर सरळ घरची वाट पकडायची. ग्रुप बंक म्हणजेच मास बंकींग केल्यावर अशाच प्रकारे टाईमपास करण्यात तरुणाई वेळ वाया घालवताना दिसते, पण हीच मज्जा सजा व्हायला वेळ लागत नाही.
परिक्षा तोंडावर आल्यावर आपल्याकडे ब-याच विषयांच्या नोट्स नाही आहेत हे त्यांना अवचित कळतं. फारशी ओळख-पाळख नसलेल्या मुलांशी पण घनिष्ट मैत्री असल्यासारखं वागायचं आणि त्यांच्याकडून आयत्या नोट्स घ्यायच्या. त्यातील काहीच मुलं मदत करणारी असतात आणि काही सपशेल नकार देणारीही असतात. मग परिक्षा जवळ आल्यावर केलेली ही मज्जा-मस्ती महागात पडते. हा त्यात जर एखाद्या शिक्षकांची मदत घ्यायची म्हटलं तर ते ही असंच म्हणतील, ‘आर यु न्यु स्टुडंट?’. त्यांच्या या वाक्याने जीव अर्धमेला होतो. मग त्या शिक्षकांना आपली ओळख पटवून देताना नाकी दम येतो. अशी काही सजा मास बंकिंगमुळे होऊ शकते. ही सजा होऊ नये म्हणून वेळीच जागं होण्याची गरज असते. कॉलेजचे दिवस परत येणार नाहीत हे जरी खरं असलं तरीही एकदा का नापास झालो तर गेलेलं वर्षसुद्धा पुन्हा येत नाही याचा तरुणाईने विचार करावा. अगदीच वर्ष बुडालं नाही तरीही एटीकेटीच्या जाळ्यात कशाला सापडायचं? कॉलेजमध्ये धम्माल मस्ती करता-करता अभ्यासाच्या बाबतीतही तरुणाईने गंभीर व्हावं. कॉलेजमध्ये असताना शिक्षणाचा फायदा कळत नसला तरीही नोकरीच्या शोधात असताना त्याचं महत्त्व कळतं. त्यावेळी झालेल्या पश्चातापाचा काही एक फायदा नसतो, म्हणून मज्जा करा पण अभ्यासही करा. त्यासाठीच काही कॉलेजिअन्सच्या बंकिंगवर या खास प्रतिक्रिया :
बंक करून देखील अभ्यास करते !
लेक्चरला पोहोचायला उशीर झाला किंवा कंटाळा आला की मी लेक्चर्स बंक करते. लेक्चर बंक केल्यानंतर आम्ही कॉलेजजवळच टाईमपास करतो किंवा कट्टयावर बसून चहाचा आस्वाद घेतो. लेक्चर बंक केल्यामुळे अभ्यासावर परिणाम होतो पण लेक्चर बंक करून फिरण्याची मज्जा काही वेगळीच असते. अशी मज्जा ठरवली तरीही पुन्हा करता येत नाही. ज्या दिवशी बंक करते त्याच्या दुस-या दिवशी लेक्चरमध्ये काय शिकवलं हे ही मैत्रीणींकडून लिहून घेते. बंक केलं असलं तरीही त्याचा परिणाम मी माझ्या अभ्यासावर होऊ देत नाही. त्यामुळे मी मज्जाही करते आणि अभ्यासही. – दिव्या पाडलेकर
दोन्हीचा तोल सांभाळतो!
मी बहुतेक वेळा लेक्चर बंक करून सी फेसला जातो. कंटाळा आला की फिरणं हा एकमेव उद्योग माझ्याकडे असतो. फिरता फिरता फोटो काढणं हा माझा छंद. त्यामुळे बंक करण्यासाठी एक कारण नाही तर हजार कारणं आहेत. ब-याच जणांना वाटतं की आम्ही वाया गेलेली मुलं आहोत. बंक करणारा मुलगा म्हणजे वाया गेलेला याचं लॉजिक मला अजूनही कळलेलं नाही. बंक करत असलो तरीही अभ्यासातही तेवढंच लक्ष देतो. हां, जरा नोट्स घेताना तारांबळ उडते, पण सगळ्यांशी चांगली मैत्री असल्यामुळे मला सहज नोट्स मिळतात. कॉलेज लाइफ एन्जॉय नाही केलं यार, असं नंतर रडत सांगण्यापेक्षा दोन्ही गोष्टींचा तोल मी सांभाळतो. – आदित्य शेटय़े
मस्ती करण्याचे दिवस!
कॉलेज म्हणजे धम्माल, मस्ती करण्याचे दिवस असतात. मी खूप बंक करतो. माझा ग्रुप असल्यामुळे बंक एकदा नाही तर अनेकदा करतो. बंक करून मुव्हीला जाणं, बाईक रायडिंग करणं हे आमचे छंद आम्ही पुरवतो. अभ्यास करायचाच असतो त्याच्यासाठी लेक्चरला बसण्याची काय गरज असं करत आम्ही एफ. वायला कमी लेक्चर्सना बसलो होतो. पण परिक्षा जवळ आल्या तेव्हा कळलं की आमच्याकडे एकही नोट्स नाहीत. नोट्स मिळवण्यासाठी मग आम्हाला तारेवरची कसरत करावी लागली, त्या दिवसापासून कानाला खडा लावला. बंक करायचं पण लगेच दुस-या दिवशी नोट्स घ्यायच्या असं ठरवलं. – रिषभ जांगडा
बेरोजगारचा टॅग माझ्या माथी नाही!
कॉलेजमध्ये असताना मी बंक केलं आहे पण जास्त नाही कारण माझ्या आईवडिलांना बाहेर फिरलेलं आवडायचं नाही, म्हणून मी बंक फार कमी करायचे. एखादं लेक्चर बंक केला तर मी जास्तीत जास्त कँटिनमध्ये किंवा कॉलेजच्या आवारातच असायचे. माझे मित्रमैत्रीणी बंक करायचे तेव्हा मलाही वाटायचं मीही करावं आणि त्यांच्यासोबत फिरायला जावं पण आईवडिलांच्या धाकामुळे असं धाडस मी केलंच नाही. त्यावेळी मला प्रचंड राग यायचा. आता मला माझ्या शिक्षणाचा फायदा होतो आहे तेही आईवडिलांमुळेच, त्यांनी मला बंधन घातलं नसतं तर मी पण इतरांसारखीच बेरोजगारचा टॅग घेऊन फिरत राहिले असते.- काजल भद्रेसा