प्रो-कबड्डी लीगच्या दुस-या हंगामातील साखळीत शुक्रवारी बंगळूरु बुल्सने तेलुगू टायटन्सवर ३५-२१ असा विजय मिळवला.
पाटना- प्रो-कबड्डी लीगच्या दुस-या हंगामातील साखळीत शुक्रवारी बंगळूरु बुल्सने तेलुगू टायटन्सवर ३५-२१ असा विजय मिळवला. या विजयामुळे बंगळूरु पुन्हा फॉर्मात आला तर तेलुगूची सलग पाच विजयांची मालिका खंडीत झाली.
अपयशी सलामीनंतर कमालीचे सातत्य राखणा-या राहुल चौधरी आणि सहका-यांना बंगळूरुविरुद्ध कामगिरी उंचावता आली नाही.
मनजीत चिल्लर आणि कंपनीने मध्यंतराला १२-९ अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने कूच केली. दुस-या सत्रातही त्यांनी सर्वोत्कृष्ट खेळ करताना आघाडी राखली.
कर्णधार मनजीतसह अजय ठाकूरने प्रत्येकी ९ गुण मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला. बंगळूरुचा सात सामन्यांतील हा पाचवा विजय आहे. तेलुगूतर्फे प्रशांत राय आणि संदीपसह (प्रत्येकी ४ गुण) कर्णधार राहुल चौधरी आणि सुकेश हेगडेने (प्रत्येकी ३ गुण) चांगला खेळ केला. मात्र दुस-या सत्रात या चौकडीचे काहीच चालले नाही. परिणामी प्रतिस्पर्धी वरचढ ठरले.
चढाई करण्यात तेलुगू आणि बंगळूरुला समान १३ गुण मिळाले तरी ‘टॅकल’ गुण मिळवण्यात बंगळूरुने (१४-६) आघाडी घेतली. त्यांचा बचावही उत्तम ठरला. चार वेळा त्यांनी तेलुगूवर लोण चढवले.