बंगालच्या उपसागरातील काकद्वीपजवळ मच्छिमारांच्या ४० नौका बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती सोमवारी मच्छिमार संघटनेने दिली. यामध्ये ६४० मच्छिमार होते.
पश्चिम बंगाल – बंगालच्या उपसागरातील काकद्वीपजवळ ६४० मच्छिमारांसह ४० नौका रविवारी बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती सोमवारी मच्छिमार संघटनेने दिली. बेपत्ता झालेल्या ४० नौकांपैकी २५ नौकांचा शोध लागला असून तर इतर १५ नौका अद्यापही बेपत्ता आहेत. यामध्ये एकूण २४० मच्छिमार आहेत.
रविवारपासून बेपत्ता असलेल्या ४० नौकांपैकी २५ नौकांचा शोध लागला आहे. यामधील सूर्यनारायणम, महारुद्र आणि सरस्वती या नौका रविवारी संध्याकाळी जाम्बू द्वीपाजवळ समुद्रातील वादळामुळे उलटल्या. महारुद्र आणि सरस्वती या दोन्ही नौकांमधील मच्छिमारांना वाचवण्यात यश आले आहे. तर सूर्यनारायण नौकेतील १५ पैकी आठ मच्छिमार अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती मस्योदोग विभागाचे सहसचिव डी. चत्तोराज यांनी दिली. जखमी झालेल्या मच्छिमारांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी तटरक्षक दलांना माहिती देण्यात आली आहे. तसेच संबंधित विभागांनाही माहिती देण्यात आली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असे मस्योदोग विभागाचे संचालक संदिप मोंडल यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी या नौका मच्छिमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या. प्रत्येक नौकेत १६ मच्छिमार होते. मात्र रविवारी आलेल्या वादळामुळे मच्छिमार आणि लायसन युनिटदरम्यानचा संपर्क तुटल्याची माहिती सहसचिव जयकृष्ण हलदेर यांनी दिली.