अन्न औषध प्रशासनाची कारवाई, साडेआठ लाखांचा औषधसाठा जप्त
भिवंडी – बोगस कंपनी निर्माण करून त्यात बनावट आयुर्वेदिक औषध तयार करून त्याची बेकायदा विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने नुकतीच कारवाई केली. एफडीएच्या पथकाने शनिवारी सायंकाळी पिंपळास गावच्या हद्दीतील जय अंबे भूमीवर्ल्डमध्ये असलेल्या मे. सिटी हर्बल प्रा. लि. या बोगस औषध कंपनीवर धडक कारवाई करून साडेआठ लाखांचा औषध साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात औषध कंपनीच्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात मुकेश लालचंद दाबी (रा. भिवंडी), नितीनकुमार भिकाजी शिंदे ,आर. के. सिन्हा, रेणुका एस. रॉय (रा. भाईंदर) अशी बनावट औषध प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या चौघांनी बोगस औषध कंपनी स्थापन करून दमा, अस्थमा, डायबेटीस, संधिवात अशा विविध आजारांवर बोगस आयुर्वेदिक औषध तयार करून त्याची बेकायदा बाजारात विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. अॅलोपॅथिक गोळ्यांच्या मिश्रणातून ही बनावट आयुर्वेदिक औषधे तयार केली जात होती. त्यानंतर त्याची बाजारात विक्री केली जात होती. या बाबत अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्तआर. एस. उरणकर, सहाय्यक आयुक्त एस. बी. पाटील यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी औषध निरीक्षक नितीन भंडारकर, किशोर रांजणे, विजय संघवी यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या पथकाने या कंपनीवर छापा टाकून कारवाई केली.