बांगलादेशचे अंपायर नादिर शहा यांच्यावर १० वर्षाच्या बंदीची कारवाई बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) केली आहे.
ढाका– एका वृत्तवाहिनीने पंचांकडून होत असलेल्या फिक्सिंगचे स्टिंग गेल्यावर्षी जगासमोर आणल्यानंतर त्यात दोषी ठरलेले बांगलादेशचे अंपायर नादिर शहा यांच्यावर १० वर्षाच्या बंदीची कारवाई बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) केली आहे. या प्रकरणातील अन्य दोषी शरफूदुल्ला सायकत यांना मात्र म्हणून पंच म्हणून पुन्हा काम करण्याची मुभा मिळाली आहे. शहा यांनी आतापर्यंत ४० वनडे आणि तीन आंतरराष्ट्रीय टी-२० लढतींमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे.
‘‘नादिर शहा यांनी चूक मान्य केली असून पुढील १० वर्षासाठी बीसीबी त्यांना एकाही स्पर्धेत पंच म्हणून नेमणार नाही. मात्र या निर्णयाविरोधात अपिल करण्याचा नादिर यांना अधिकार आहे,’’ असे बीसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. आयसीसीनेही या कारवाईचे समर्थन केले आहे.
‘‘क्रिकेटमध्ये भ्रष्टाचाराला कोणतेही स्थान नाही हा संदेश यानिमित्ताने दिला गेला आहे. फक्त क्रिकेटपटूच नाही तर अंपायर, क्युरेटर आणि प्रशासक यांच्यावरही कारवाई होऊ शकते हे यानिमित्ताने दिसले,’’ असे आयसीसीचे मुख्य अधिकारी डेव रिचर्डसन यांनी सांगितले.
वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंगमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानातील पंच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत फिक्सिंग करत असल्याचे समोर आले होते.