भाजपाला दिल्लीत मिळालेल्या धोबीपछाडानंतर या ‘आपबिती’त न अडकता बाजार पुन्हा धावपट्टीवर आला आहे.
मुंबई – भाजपाला दिल्लीत मिळालेल्या धोबीपछाडानंतर या ‘आपबिती’त न अडकता बाजार पुन्हा धावपट्टीवर आला आहे. सलग दुस-या सत्रात १०० पेक्षा जास्त अंकांची कमाई करत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने वेग पकडला आहे.
बुधवारी हा निर्देशांक १७८.३५ अंकांच्या वाढीसह २८,५३३.९७ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ६१.८५ अंकांची वाढ नोंदवत ८,६२७.४०वर बंद झाला. यामधून विकासाभिमुख अर्थसंकल्पावर दोन्ही निर्देशांकांनी डाव लावण्यास सुरुवात केली आहे.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची चिंता, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा बिघडणारी स्थिती या पार्श्वभूमीवर सलग सात सत्रांत जवळपास १४०० अंकांची घसरगुंडी अनुभवणा-या सेन्सेक्सने मंगळवारपासून पुन्हा भरपाईचा मार्ग पत्करलेला आहे.
अर्थसंकल्पाला जेमतेम १५ दिवस उरलेले असताना गुंतवणूकदारांनी सुधारणावादी, गुंतवणूकस्नेही आणि विकासाभिमुख अर्थसंकल्पाच्या अपेक्षेने गुंतवणुकीचा जोर वाढवला आहे. याला जागतिक बाजारांचीही चांगली सात मिळाली.
भांडवली वस्तू, धातू, वीज आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर तेजीचे मानकरी ठरले. स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांनी अनुक्रमे १.४७ टक्के आणि १.५५ टक्क्यांची वाढ नोंदवली. गुंतवणूकदारांकडून संपूर्ण वर्षभरासाठी असलेल्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पावर लक्ष केंद्रित केले जात आहे. १९९०नंतर प्रथमच येता अर्थसंकल्प शेअर बाजारासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. त्या वेळी देशाने खुले धोरण
स्वीकारले होते, असे मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे.
सेन्सेक्सने वाढीसह २८,४५०.२६वर सुरुवात केली आणि दिवसभरातील २८,६१८.९१ची उंची गाठली होती. गेल्या दोन सत्रांमध्ये या निर्देशांकाने ३०६.५८ अंकांची भर घातली आहे. दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी १२६१.१९ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. सेन्सेक्समधील३०पैकी २१ शेअर घसरले. अॅक्सिस बँक, एलअँडटी, मारुती सुझुकी, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, एचयूएल, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो यांचे शेअर तेजीच्या यादीत राहिले.
मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात आलेल्या तेजीच्या लाटेने आशियाई बाजाराला ऊब मिळाली. चीन, सिंगापूर, तायवान आणि दक्षिण कोरिया यांच्या प्रमुख शेअर बाजारांनी ०.३० टक्के ते ०.५१ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली. हाँगकाँगच्या हँगसेंगमध्ये घसरण झाली तर जपानचे बाजारांना सुट्टी होती.
ग्रीस आणि आंतरराष्ट्रीय पतपुरवठादार यांच्यात सौदा पक्का होण्याच्या शक्यतेने अमेरिकन बाजारात तेजीत आले. तर युरोपीय बाजारातील गुंतवणूकदारांनी ग्रीक कर्जासंबंधी पुढची घडामोड काय घडते यावर लक्ष ठेवत सावध पवित्रा घेतला. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन यांचे बाजार ०.०९ टक्का ते ०.५२ टक्क्यापर्यंत घसरणीसह व्यवहार करत होते.
औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि किरकोळ महागाईच्या आकडेवारी जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी काहीसा सावध पवित्रा घेतल्याने वाढीवर मर्यादा आली. विशेष म्हणजे, सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांवर हिरवा झेंडा फडकला. ज्यामुळे बाजाराला
बळ मिळाले.
– जयंत मांगलिक, अध्यक्ष (किरकोळ विक्री), रेलिगेअर सिक्युरिटीज