दशावतारातील नाटकांत काम करणारा कलाकार हा रंगभूमीवर पोहोचतो तो कलेवर असणा-या निस्सीम प्रेमामुळे!
सिंधुदुर्ग- दशावतारातील नाटकांत काम करणारा कलाकार हा रंगभूमीवर पोहोचतो तो कलेवर असणा-या निस्सीम प्रेमामुळे! हौसेला मोल नसते, याची प्रचिती या दशावतारी कलाकारांच्या वावरातून स्पष्टपणे दिसत असते. बाबू माईणकर हे व्यक्तिमत्त्वही असेच! वयाच्या १५व्या वर्षापासूनच रंगभूमीवर वावरणारे माईण, ता. कणकवली येथील नारायण वासुदेव गावकर यांनी दशावतारी कलाकारांत एक वेगळे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. यामुळेच दशावतारात गावकर हे नाव मागे पडले आणि बाबू माईणकर सर्वश्रुत झाले.
प्रारंभीच्या काळातील ‘बाबू’ आता वयाने ज्येष्ठ असले तरी सर्वांच्याच तोंडी त्यांचे हे नाव आदराने घेतले जाते. कलावंताच्या नाना त – हा आपल्याला सर्वाना ज्ञात आहेत. मात्र, बाबू माईणकर यांच्या वैशिष्टय़पूर्ण लकबी त्यांच्या नजाकती आणि एखाद्या पात्राला न्याय देण्यासाठी त्यात झोकून देण्याची त्यांची भूमिकाच बरेच काही सांगून जाते.
वयाच्या १५व्या वर्षात दशावतारात पदार्पण करणा-या गावकरांनी प्रारंभी राजकुमारीची भूमिका करताना दाखवत असलेला अल्लडपणा अनेकांना भावायचा. आता वयपरत्वे राणीच्या सात्त्विक भूमिकेत वावरताना अनेक भूमिकांवर वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांची मत्स्यगंधा, दु:शीला बालहत्या चारित्रातील वैजयंती ज्यांनी ज्यांनी पाहिली ते त्यांच्या अभिनयाने अवाक् झाले होते.
आताही रसिक त्यांच्या या भूमिकांसाठी विशेष खेळाची मागणी करत असतात. आपल्या या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली याबाबत बोलताना ते म्हणाले, कलेचा वारसा घरातूनच मिळाला. वडिलांनी दशावतारात वेगळे वलय निर्माण केले होते. आपण रंगभूमीवर वावरताना आप्पा दळवी, बाळ भाट, वासुदेव सामंत, धोंडी महानकर, सुधीर किलगण, तुकाराम गावडे, यशवंत तेंडोलकर, पप्पू राणे, नाथा गोसावी, बबन वाघ, रामू गुरव, अशी अनेक नावे सांगता येतील ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक टप्प्यावर नवी उमेद दिली आहे, असे बाबू माईणकर म्हणाले.