बायर्न म्युनिचला २-० नमवत बोरुसिया डॉर्टमुंडने बुधवारी जर्मन डीएफएल सुपर कप फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकवले.
डॉर्टमुंड- बायर्न म्युनिचला २-० नमवत बोरुसिया डॉर्टमुंडने बुधवारी जर्मन डीएफएल सुपर कप फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकवले. हेन्रिक मिखतारायन (२३वे मिनिट) आणि पिअरी-एम्रिक युबामयांग (६२वे मिनिट) यांचे प्रत्येकी एक गोल डॉर्टमुंडच्या विजयात मोलाचे ठरले. डॉर्टमुंडने विक्रमी सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकताना विजेतेपद राखले.
या लढतीत बायर्नला फ्रॅँक रिबेरी, रॅफिना आणि बॅस्टियन श्वाइनस्टायगरची उणीव भासलेली दिसली. त्यांच्या अनुपस्थितीत फिलिप लाम, मारियो गोट्झा या वर्ल्डकप विजेत्या जर्मन फुटबॉलपटूंना प्रभाव पाडता आला नाही. त्यातले त्यात गोलकीपर मॅन्युअल नॉयरने मात्र बायर्नसाठी काही महत्त्वपूर्ण गोल होण्यापासून वाचवले. डॉर्टमुंडने घरच्या मैदानावर खेळताना सुरुवातीपासून प्रभाव पाडला. गेल्या हंगामातील बुंदेस्लिगा विजेता आणि डीएफबी पोकल विजेता यांच्यात जर्मन सुपर कप खेळवण्यात येतो. डॉर्टमुंडने या जेतेपदासोबतच डीएफबी पोकल आणि आगामी बुंदेस्लिगा या जर्मनीतील फुटबॉल हंगामासाठी सज्ज असल्याचा इशारा दिला.