आयपीएल-सहा मधील गुरुवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सनी सावध सुरुवात करताना १५ षटकांत पाच बाद १०० धावा केल्या.
बंगळूरु – आयपीएल-सहा मधील गुरुवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सनी सावध सुरुवात करताना १५ षटकांत पाच बाद १०० धावा केल्या. अहमदाबादच्या जसप्रित बुमराहने तीन विकेट्स घेत यशस्वी आयपीएल पदार्पण केले.
डावाच्या तिस-या आणि वैयक्तिक दुस-या षटकांत दिलशानला त्रिफळाचीत करत मिचेल जॉन्सनने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. आठ चेंडू खेळूनही त्याला खाते उघडता आले नाही. सलामीप्रमाणे दुस-या लढतीतही पहिली विकेट ‘त्रिफळाचीत’ स्वरुपातील होती. तसेच बाद झालेला सलामीवीर शून्यावर बाद झाला. जॉन्सनला चौकार ठोकत खाते उघडणाऱ्या कर्णधार कोहलीने पुढील षटकात मुनाफ पटेलला षटकार ठोकला. त्यानंतर नवोदित जसप्रित बुमराहला तीन चौकार ठोकले. मात्र त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर कोहलीला (१४ चेंडूंत २१ धावा) पायचीत करत बुमराहने आयपीएलमधील विकेट्सचा श्रीगणेशा केला. मयांक अगरवाललाही (१) त्याने आल्यापावली माघारी धाडले. सचिनने त्याचा झेल टिपला. फटकेबाज ख्रिस गेलने सावध सुरुवात केली. त्यामुळे त्याचा पहिला चौकार पाहण्यासाठी आठव्या षटकाची वाट पाहावी लागली. त्यानंतर फटकेबाजी करत अर्धशतक ठोकले.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या मुंबईने अंतिम संघात कर्णधार रिकी पाँटिंगसह कीरॉन पोलार्ड, मिचेल जॉन्सन आणि जेकब ओरम या परदेशी क्रिकेटपटूंना स्थान दिले. मात्र ‘मिलियन डॉलर मॅन’ ग्लेन मॅक्सवेलला प्राधान्य दिले नाही. गुजरातचा मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयपीएल पदार्पण केले. बंगळूरुने सलामीच्या लढतीत ख्रिस गेलसह तिलकरत्ने दिलशान, डॅनियल ख्रिस्तियन आणि मुथय्या मुरलीधरनला खेळवले. कसोटी मालिकेत खो-याने धावा करणा-या कसोटीपटू चेतेश्वर पुजारावर युवा कर्णधार विराट कोहलीने अविश्वास दाखवला.