रवी शास्त्री यांना संघाचे डायरेक्टर नेमण्यात आल्याने प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र दस्तुरखुद्द भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीनेच फ्लेचर हेच ‘बॉस’ असल्याचे रविवारी स्पष्ट केले.
ब्रिस्टॉल- रवी शास्त्री यांना संघाचे डायरेक्टर नेमण्यात आल्याने प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र दस्तुरखुद्द भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीनेच फ्लेचर हेच ‘बॉस’ असल्याचे रविवारी स्पष्ट केले. इतकेच नाही पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणा-या वनडे वर्ल्डकपपर्यंत फ्लेचर हेच प्रशिक्षक असतील असेही त्याने स्पष्ट केले.
‘‘फ्लेचर हे वर्ल्डकपमध्ये आमचे प्रशिक्षक असतील यात कोणतीही शंका नाही. अजूनही तेच बॉस आहेत. आता रवी शास्त्रीदेखील संघात आहेत. मात्र फ्लेचर हेच मुख्य बॉस आहेत. (शास्त्री यांच्या नेमणुकीमुळे) फ्लेचर यांचे अधिकार काढून घेण्यात आलेले नाहीत हे सांगू इच्छितो. मीडियामध्ये कसे चित्र रंगवण्यात येत आहे हे मला माहित नाही मात्र संघाचा कार्यभार पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये थोडाफार बदल झाला असला तरी कार्यभारात बदल झालेला नाही. ट्रेवर (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) आणि जो (गोलंदाजी प्रशिक्षक) यांची हकालपट्टी झाली असली तरी त्यांना मी समजू शकतो. मैदानावर क्रिकेटपटूंच्या चुका होत असल्या तरी हा सपोर्ट स्टाफ थेट काहीही करू शकत नाही. मात्र आता नवीन सपोर्ट स्टाफचे आम्ही स्वागत करतो. आता ते ड्रेसिंग रुमच्या कुटुंबापैकीच एक आहेत. आता त्यांना स्थिरावायला थोडा वेळ द्यायला हवा,’’ असे ढोणीने म्हटले.
ढोणीने यावेळी संघाचे नवीन डायरेक्टर रवी शास्त्री यांचेही कौतुक केले. ‘‘शास्त्री हे संघात आले आहेत ही खूप चांगली बाब आहे. लढवय्या आणि १०० टक्के योगदान देणारे म्हणून त्यांची ओळख आहे. भारताचे क्रिकेटपटू असल्याचा अभिमान ते नेहमीच बाळगत आले आहेत. ते पाहता आमच्या संघातील क्रिकेटपटूंशी संवाद साधणे त्यांना कठीण जाणार नाही,’’ असे ढोणीने स्पष्ट केले.