बीसीसीआयने पुरवला रवी शास्त्रींचा हट्ट, संजय बांगर यांना सहप्रशिक्षकपदी बढती
मुंबई – माजी मध्यमगती गोलंदाज भरत अरुण यांची भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी फेरनिवड करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नवनियुक्त प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा हट्ट पुरवला. विद्यमान फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना सहप्रशिक्षकपदी बढती देण्यात आली आहे. क्षेत्ररक्षण (फिल्डिंग) प्रशिक्षक आर. श्रीधर यांनाही कायम ठेवण्यात आले आहे.
बी. अरुण यांचा करार करार गेल्या वर्षी संपुष्टात आला. त्यानंतर भारताचा संघ गोलंदाजी प्रशिक्षकाविना होता. मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयच्या सल्लागार समितीने माजी मध्यमगती गोलंदाज झहीर खानची शिफारस केली केली होती. मात्र त्याच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह होते. त्यातच मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांना पूर्णवेळ आणि त्यांच्या मर्जीतला प्रशिक्षक हवा होता. अरुण यांची आजवरची कारकिर्द पाहता शास्त्री यांनी त्यांच्यासाठी हट्ट धरला. अरुण यांचा दोन वर्षाचा आहे. २०१९ आयसीसी वनडे वर्ल्डकपपर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. माजी सलामीवीर बांगर आणि श्रीधर यांचाही करार वाढवण्यात आला आहे. जून २०१६मध्ये दोघांचा करार एका वर्षाने वाढवण्यात आला होता. २०१४मध्ये तत्कालीन प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या नियुक्तीनंतर (ऑगस्ट २०१४) बांगर, अरुण आणि श्रीधर हे त्रिकुट सपोर्ट स्टाफमध्ये आहे. फ्लेचर पायउतार झाल्यानंतर शास्त्री यांच्या टीम डायरेक्टरपदाच्या काळातही या तिघांचा समावेश होता.
अरुण यांच्या नियुक्तीसह बांगर आणि श्रीधर यांचा करार वाढवण्याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय नियुक्त प्रशासकीय समितीने मंगळवारी बीसीसीआयच्या मुख्यालयात मुंबईत घेतला. त्यानंतर समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी प्रसारमाध्यमांना त्याबाबत माहिती दिली.
तत्पूर्वी, शास्त्री यांनी सपोर्ट स्टाफबाबत सुचवलेल्या पर्यायांबाबत चार सदस्यीय समितीच्या शिफारशींचा अभ्यास केला. प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडलजी यांच्यासह बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना, सचिव अमिताभ चौधरी, सीईओ राहुल जोहरी यांनी सपोर्ट स्टाफबाबत शास्त्री यांच्याशी चर्चा केली. दोन वर्षे पदभार सांभाळायचा असल्याने आपल्याला अपेक्षित स्टाफ असावा, असे शास्त्री यांनी यावेळी समितीसमोर सांगितले.
झहीर, द्रविडच्या नियुक्तीबाबत निर्णय नाही
विशिष्ट दौ-यांसाठी गोलंदाजी आणि फलंदाजी सल्लागार म्हणून शिफारस करण्यात आलेल्या अनुक्रमे झहीर खान आणि राहुल द्रविडच्या नियुक्तीबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. याबाबत शास्त्री यांना विचारले असता, ‘‘झहीर आणि द्रविड यांना किती दिवस संघासोबत राहता येईल, यावर सर्वकाही अवलंबून आहे. मात्र त्यांचे मार्गदर्शन आणि सल्ला मिळाला तर उत्तम. आम्ही त्यांचे स्वागत करू,.’’