हॉकी वर्ल्डकपमध्ये २-३ असे पराभूत व्हावे लागले तरी ‘ग्रुप ए’मध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या बेल्जियमला भारताने झुंजवले.
द हेग – हॉकी वर्ल्डकपमध्ये २-३ असे पराभूत व्हावे लागले तरी ‘ग्रुप ए’मध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या बेल्जियमला भारताने झुंजवले. दुस-या सत्रात एका क्षणी २-२ अशा बरोबरीत लढत संपणार, असे वाटतानाच अखेरच्या १६ सेकंदात गोल बहाल केल्याने भारतावर पराभवाची नामुष्की आली. याबरोबरच विजयी सुरुवात करण्याचे भारताचे स्वप्न भंगले.
५०व्या मिनिटाला २-१ आघाडी घेऊनही उर्वरित २० मिनिटे भारताला बचाव करता आला नाही. ५६व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत बेल्जियमने २-२ बरोबरी साधली. अखेरच्या तीन मिनिटांत भारताच्या वाटय़ाला सामन्यातील एकमेव पेनल्टी कॉर्नर आला. त्यावर रघुनाथने चुकीचा फटका मारल्याने भारताची आघाडी घेण्याची संधी गेली.
अखेर १६ सेकंद बाकी असताना गोल करत बेल्जियमने युरोपियन हॉकीमध्ये सध्या त्यांचा दबदबा का आहे हे दाखवून दिले. या लढतीत बेल्जियमला एकूण ६ पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यातील एकाचाच ते फायदा घेऊ शकले. भारतातर्फे मनदीप सिंग आणि अक्षदीप सिंग यांनी गोल केले.
श्रीजेशचा बचाव उत्तम, पण ..
पहिल्या सत्रात भारताने जास्त करून गोलकीपर पी. आर. श्रीजेशने अभेद्य बचाव केला. बेल्जियमने पहिल्या सत्रात ५० टक्यांपेक्षा जास्त चेंडूचा ताबा त्यांच्याकडे ठेवला होता. मात्र गोल करण्यात त्यांना अपयश येत होते. त्यातच युवराज वाल्मिकीने १०व्या मिनिटाला केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर १५व्या मिनिटाला बेल्जियमचा प्रयत्न श्रीजेश आणि व्ही. आर. रघुनाथने हाणून पाडला.
त्यानंतर बेल्जियमला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र तिन्ही पेनल्टी कॉर्नर त्यांनी गमावले. याउलट चेंडूवर विशेष ताबा न मिळवू शकलेल्या भारताच्या वाटय़ाला या सत्रात एकही पेनल्टी कॉर्नर आला नाही. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटणार, असे वाटताना एक मिनिट बाकी असताना फ्लॉरेंट वॅन युबेलने (३४वे मिनिट) बेल्जियमला आघाडी मिळवून देणारा गोल केला. तत्पूर्वी, खेळ सुरू झाल्यावर बेल्जियमच्या हॉकीपटूशी टक्कर झाल्याने चिंग्लेनसनाला १०व्या मिनिटांतच मैदान सोडावे लागले.
भारताच्या प्रेक्षकांची चांगली उपस्थिती
पहिल्या लढतीत भारतीय फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये बऱ्यापैकी भारतीय प्रेक्षक तिरंगा घेऊन उपस्थित होते. ‘इंडिया इंडिया’ म्हणत ते सरदार सिंग आणि कंपनीचा आत्मविश्वास उंचावत होते. श्रीजेशने प्रत्येक वेळी केलेल्या अभेद्य बचावावेळीही प्रेक्षकांनी त्याला चांगलीच दाद दिली.