तिरंगी स्पर्धेच्या प्राथमिक साखळीत मंगळवारी (२ जुलै) भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान आहे.
किंगस्टन – तिरंगी स्पर्धेच्या प्राथमिक साखळीत मंगळवारी (२ जुलै) भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान आहे. अपयशी सलामीनंतर दोन्ही संघ गुणांचे खाते उघडण्यास उत्सुक आहे.
चँपियन्स ट्रॉफी जेतेपदानंतर भारताच्या कामगिरीकडे सर्वाचे लागले होते. मात्र महत्त्वपूर्ण क्षणी यजमानांनी बाजी मारली. वेस्ट इंडिजच्या तळातील क्रिकेटपटूंचा ‘रोल’ यात महत्त्वपूर्ण राहिला. रोहित शर्मा आणि सुरेश रैनाने चांगली फलंदाजी केली तरी भारताला २०-२५ धावा कमी पडल्या. श्रीलंकेविरुद्ध फलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल. भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवने सुरुवातीला प्रभावी मारा केला तरी सर्व काही आलबेल नाही.
भारताच्या फिरकीपटूंना विविधता आणण्याची गरज आहे. श्रीलंकेला अनेक समस्या जाणवत आहे. पहिल्या लढतीत यजमानांनी त्यांच्यावर बोनस गुणाने विजय मिळवला. त्यामुळे सर्व आघाडय़ांवर कामगिरी उंचावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
चँपियन्स ट्रॉफीत हरवल्याने मंगळवारच्या लढतीत भारताचे पारडे जड वाटते. मात्र कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने ही सीनियर जोडी तसेच तेज गोलंदाज लसित मलिंगा आणि प्रभावी फिरकी भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. सबिना पार्क खेळपट्टीकडून फिरकीपटूंना अपेक्षित यश मिळत नसल्याने तेज गोलंदाजांवर सांघिक यशापयश ब-यापैकी अवलंबून आहे.
ढोणीची दुखापत गंभीर?
कर्णधार महेंद्रसिंग ढोणीची दुखापत तसेच त्याच्या खेळण्याबाबत संघव्यवस्थापनाने खुलासा करण्यास नकार दिला तरी त्याची दुखापत गंभीर मानली जात आहे. कदाचित स्पर्धा अध्र्यावर सोडून तो मायदेशी परतू शकतो. ‘‘हॅमस्ट्रिंग दुखापतीतून ढोणी सावरलेला नाही. त्याच्या उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी दुखापतीचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल,’’असे माहितगारांनी सांगितले.
भारत : महेंद्रसिंग ढोणी (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मुरली विजय, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शामी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, अमित मिश्रा, आर. विनय कुमार.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, लहिरु थिरिमने, उपुल तरंगा, जीवन मेंडिस, अजंठा मेंडिस, दिनेश चंडीमल, नुवान कुलसेकरा, लसित मलिंगा, सचित्र सेनानायके, रंगना हेरथ, दिलहारा लोकुहेटिगे, शमिंडा एरंगा.