न्यूझीलंडपाठोपाठ गतविजेत्या भारताला यंदाच्या विश्वचषकात सलग पाच विजय नोंदवण्याची संधी आहे.
हॅमिल्टन- न्यूझीलंडपाठोपाठ गतविजेत्या भारताला यंदाच्या विश्वचषकात सलग पाच विजय नोंदवण्याची संधी आहे. गटवार साखळीत (ब) मंगळवारी (१० मार्च) भारताची गाठ आर्यलडशी पडेल. प्रतिस्पर्धी जिगरबाज असला तरी भारताचे पारडे जड आहे.
भारत सुसाट, मात्र आर्यलड सावध
भारताने विजयाचा ‘चौकार’ लगावत आपल्या प्रतिष्ठेला साजेसा खेळ केलाय. उपांत्यपूर्व फेरी नक्की झाल्याने उर्वरित लढतींमध्ये राखीव क्रिकेटपटूंना खेळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
नवख्या आर्यलडने चारपैकी तीन लढती जिंकत पहिल्यांदाच विश्वचषकाची बाद फेरी गाठण्यादृष्टीने दावेदारी पेश केली आहे. माजी विजेता वेस्ट इंडिजला हरवल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला तरी भारताविरुद्धचा त्यांचा कस लागेल.
भारताने राखीव क्रिकेटपटूंना संधी दिली तरी त्यांना कमकुवत समजण्याची चूक आम्ही करणार नाही, असे आर्यलडचा कर्णधार विल्यम पोर्टरफिल्डने म्हटलेय. ‘‘कामगिरी सातत्य राखण्याचा प्रयत्न करू, तसेच दडपण न घेता खेळू,’’ असे त्याने सांगितले.
खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल
हॅमिल्टनमधील सेडॉन पार्कची खेळपट्टीवर आजवर गोलंदाजांनी वर्चस्व राखलेय. येथे चेंडू चांगला स्विंग होतो. मात्र भारत-आर्यलड लढतीसाठीची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असेल, असे क्युरेटर कार्ल जॉन्सन यांनी म्हटलेय.
सेडॉन पार्कवर विश्वचषकासाठीची खेळपट्टी बनवण्यासाठी १४ दिवस लागले. एकूण नऊ खेळपट्टया बनवण्यात आल्यात. यापूर्वी झालेल्या दोन आणि आताची एक अशा तीन लढती याच खेळपट्टयांवर होतील. मात्र प्रत्येक खेपेस खेळपट्टीचा रागरंग वेगळा असेल, असे जॉन्सन म्हणाले. क्युरेटर्सचा अंदाज खरा ठरल्यास मंगळवारी फलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरेल.
विराट, धोनीवर भारताची सर्वाधिक भिस्त
भारताची फलंदाजी मजबूत आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मासह अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैनाने चांगले योगदान दिले तरीही विराट कोहलीसह कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर सर्वाधिक भिस्त आहे.
या दुकलीलाच महत्त्वाची भूमिका निभवावी लागेल. त्यातच वेस्ट इंडिजविरुद्धची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. प्रतिस्पध्र्याकडे ‘स्टार’ आणि अनुभवी गोलंदाज नसल्याचा फायदा भारताला मिळू शकतो.
आर्यलडकडेही केव्हिन ओब्रायनसह कर्णधार पोर्टरफिल्ड असे चांगले फलंदाज आहेत. मात्र भारताचे गोलंदाज बहरात आल्याने त्यांची जबाबदारी वाढली आहे.
रायडू, अक्षरला संधी मिळेल?
राखीव क्रिकेटपटूंना संधी मिळण्याची शक्यता पाहता अंबाती रायडू आणि अक्षर पटेलला अंतिम संघात स्थान मिळू शकते. रायडूला खेळवल्यास रैना किंवा रहाणेपैकी एकाचा पत्ता कट होऊ शकतो. रवींद्र जडेजाच्या जागी अक्षरला खेळवता येऊ शकते.
मात्र जडेजा हा धोनीच्या मर्जीतला आहे. राखीव क्रिकेटपटूंना संधी देतानाच अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीलाही संधी मिळू शकते. स्विंगला मिळणारी अधिक मदत पाहता मध्यमगती भुवनेश्वर कुमारलाही खेळवले जाईल. त्याद्वारे दुखापतग्रस्त भुवनेश्वरची तंदुरुस्ती तपासता येईल.
स्टेडियम ‘हाऊसफुल्ल’
भारत-आर्यलड लढतीसाठीचे सेडॉन पार्क स्टेडियम ‘हाऊसफुल्ल’ आहे. या स्टेडियमची प्रेक्षकमर्यादा १०,२०० असून सर्वच्या सर्व तिकीटे संपल्याचे आयसीसीचे व्यवस्थापक (मीडिया ऑपरेशन्स) निकोलास कॅवानॅघ यांनी रविवारी सांगितले. एकूण तिकिटांपैकी ३२०० सीट्स स्टेडियममध्ये आहेत.
उर्वरित ७००० प्रेक्षकांना स्टेडियममधील मोकळया गवतावर बसून सामन्याचा आनंद लुटता येईल. गटवार साखळीत न्यूझीलंडमध्ये भारताच्या दोनच लढतीत असल्याने अनिवासी भारतीयांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. ऑकलंडमध्ये मोठया प्रमाणात भारतीय असून आर्यलडविरुद्धच्या लढतीसाठी तेथूनच सर्वाधिक प्रेक्षक येणार असल्याचे समजते.
न्यूझीलंडमधील भारताची पहिलीच लढत
आर्यलडविरुद्धच्या लढतीनिमित्ताने भारत या विश्वचषकात प्रथमच न्यूझीलंडमध्ये खेळेल. पहिल्या चारही लढती ऑस्ट्रेलियात झाल्या. त्यात दोन पर्थ तसेच अॅडलेड आणि मेलबर्नवर प्रत्येकी एक सामना झाला.यात पर्थवरील वेस्ट इंडिजविरुद्धची लढत वगळता महेंद्रसिंग धोनी आणि सहकाऱ्यांनी निर्विवाद वर्चस्व राखलेय.
मात्र पर्थवरून हॅमिल्टनला (व्हाया मेलबर्न) जाताना भारतीयांना खूप प्रवास करावा लागला. या मोठया प्रवासात शनिवारचा दिवस वाया गेला. रविवारी विश्रांती घेऊन धोनी आणि कंपनी सोमवारी सराव करेल.
गटवार साखळीतील उर्वरित दोन्ही लढती भारताला न्यूझीलंडमध्ये खेळायच्या आहेत. येथील खेळपट्टयाही जवळपास ऑस्ट्रेलियासारख्याच आहेत. मात्र प्रवासाचा शीण घालवतानाच वातावरणासह खेळपट्टीशी जुळवून घेताना भारताच्या क्रिकेटपटूंचा कस लागेल.
संघ
भारत
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, उमेश यादव, मोहित शर्मा.
आर्यलड
विल्यम पोर्टरफिल्ड (कर्णधार), अॅँडी बॅलबिर्नी, पीटर चेझ, अॅलेक्स कुसॅक, जॉर्ज डॉक्रेल, एड जॉयस, अॅँडी मॅकब्रिन, जॉन मूनी, केव्हिन ओब्रायन, नियाल ओब्रायन, मॅक्स सॉरेन्सन, पॉल स्टर्लिग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्सन, क्रेग यंग.